सातारा | काका पुतण्याचा वाद महाराष्ट्राला नवीन नाही अशीच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक गोष्ट साताऱ्यातून समोर आली आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचं षडयंत्र उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीच्याच युवा नेत्याचा आणि आमदाराच्या भावकीतील व्यक्तीचा यात सहभाग असल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचं षडयंत्र असल्याचं एका तरुणीने उघड केलं आहे. यासंबंधात सातारा पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राष्ट्रवादीचा युवा नेता आणि मोहिते यांचा एक निकटवर्तीय असल्याचीही धक्कादायक माहिती समोर येत आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शैलेश मोहिते पाटील या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसचा समावेश आहे. त्याबरोबरच, राहुल किसन कांडगे, सोमनाथ दिलीप शेडगे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा डाव होता, असं या युवतीने सांगितलं. त्याबरोबरच या कामासाठी त्याच मुलीला काही पैसेही देण्यात आले होते. पण या प्रकाराबाबत स्वतः मुलीनेच खुलासा केल्याने खळबळ माजली आहे. या बदल्यात तिला काही पैसे आणि पुण्यात एक फ्लॅटही देण्यात येणार होता.
नोकरीच्या बहाण्याने आमदारांकडे जाऊन त्यांच्याशी संपर्क वाढवायचा आणि त्यानंतर त्यांना बदनाम करायचं यासाठी त्या मुलीला 90 हजार रुपये देण्यात आले होते. हा सर्व प्रकार चुकीचा वाटल्याने त्या मुलीने थेट आमदारांचे पुतणे आणि तक्रारदार असणाऱ्या मयूर मोहिते यांना फोन केला आणि सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर, मयूर मोहिते यांनी सातारा पोलिसांशी संपर्क करून संबंधित घटनेची माहिती दिली आणि नंतर पोलिसांनी या युवतीकडे चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद