Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली पंढरपुर मतमोजणी केंद्राची पाहणी

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली पंढरपुर मतमोजणी केंद्राची पाहणी

मित्राला शेअर करा

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे उद्या रविवार दिनांक 2 मे 2021 रोजी सकाळी 8.00 वाजलेपासून सुरु होणार आहे. या मतमोजणी केंद्रात सुरक्षिततेच्या व कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले , सहायक निवडणूक अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे उपस्थित होते.

मतमोजणीबाबत तसेच कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतमोजणी कक्षात संपूर्ण ठिकाणी औषध फवारणी करुन घ्यावी. कक्षातील विद्युत जोडण्यामध्ये कुठेही शॉर्टसर्किट होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. अग्निशमन दल, वैद्यकीय पथक कार्यरत ठेवावे तसेच पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टिने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मतमोजणी टेबल, आरोग्य कक्ष, पीपीई किट कक्ष, प्रसार माध्यम कक्ष यांची पाहणी करुन आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मतमोजणी टेबलवर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क, फेसशिल्ड, पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले. तसेच मतदान कक्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.