बार्शी : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच येथे इतर तालुक्यांतून येत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची होत असलेली गैरसोय पाहून, मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद समोर ठेवून जातिधर्माच्या पलीकडे जाऊन बागवान मक्का मस्जिदच्या विश्वस्तांनी मस्जिदमध्येच १०० बेड व किचन तयार करून जेवणासह राहण्याची सोय केली आहे. दातृत्वाचा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवल्याने याबाबत शहरासह तालुक्यात व जिल्ह्यात कौतुक होत आहे.
मध्य वस्तीमध्ये पांडे चौक येथे असलेल्या बागवान मक्का मस्जिद विश्वस्त, बार्शी शहर शिवसेना, राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, गृहनिर्माणचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या उपस्थितीत १ मे रोजी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या बागवान मक्का मस्जिदमध्ये १०० बेड, जेवण तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, ताट, वाट्या, ग्लास व तांबे यासह गॅसची व्यवस्था, फळे, भाजीपाला अद्ययावत करण्यात आला असून स्वच्छतागृहाचीही सोय करण्यात आली आहे. याप्रसंगी बोलताना भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, शहरामध्ये आरोग्य व्यवस्था मोठी, उत्तम असल्याने तालुक्यासह इतर भूम, परंडा, करमाळा, माढा, वाशी, मोहोळ, खर्डा, कळंब व उस्मानाबाद आदी तालुक्यांतील रुग्ण येथे उपचार घेत आहेत. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाइकांची खूप मोठी हेळसांड होताना दिसत होती. त्यांची सोय व्हावी हा मुख्य हेतू मनामध्ये होता.
मक्का मस्जिदचे विश्वस्त शौकत महंमद हनिफ येडशीकर, दिलावर बागवान, रतन बागवान, हाजी लियाकत बागवान यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अशा संकटकाळी मदत करणे हीच मानवता आहे, असे सांगून शंभर बेडसह जेवण तयार करण्यास होकार दिला आणि उपक्रम राबवण्याचे ठरवले. मस्जिदमध्ये दोन मोठे हॉल असून एक हॉल पुरुषांसाठी तर दुसरा हॉल महिलांसाठी करण्यात आला आहे. स्वतःला पाहिजे ते जेवण तयार करायचे असून तेथे सर्व व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये बार्शीच्या मस्जिद व्यवस्थापनाचा हा निर्णय वाखाणण्याजोगा असून, रुग्णांच्या नातेवाइकांची सोय कोठेही होत नसल्याने मस्जिद विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद