सोलापूर, दि.२६ : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वृक्षारोपणाची चळवळ रुजावी यासाठी वन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे येत्या पाच जून, पर्यावरण दिनापासून ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान राबवली जाणार आहे. या अभियानामध्ये जास्तीत जास्त देशी, स्थानिक प्रजातीची रोपे लावली जावीत. रोपांच्या वाढीची आणि संवर्धनाची जबाबदारी घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले आहे.
सोळा लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्ह्यात यंदा सुमारे सोळा लाख वृक्षारोपण केले जाणार आहे.यापैकी अकरा लाख रोपे वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत लावली जाणार आहेत. उर्वरित पाच लाख रुपये विविध विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लावली जाणार आहेत.
देशी, स्थानिक प्रजातींना प्राधान्य या रोपात सर्व देशी आणि स्थानिक प्रजाती निवडण्यात आल्या आहेत. कारण या प्रजाती ऑक्सिजन जास्त प्रमाणात सोडतात त्याचबरोबर पक्षी इतर जीव आणि परिस्थितीकीला पोषक असतात,असे श्री. पाटील यांनी सांगितले.
रोपे देण्याची व्यवस्था
वृक्षारोपण चळवळीत सहकारी संस्था,शिक्षण संस्था,औद्योगिक कंपन्या यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा संस्थांनी शंभरपेक्षा अधिक वृक्षारोपण करण्याची तयारी दाखविल्यास या संस्थांना रोपे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
विविध स्पर्धांचे आयोजन
वृक्षारोपणाचे महत्व विद्यार्थी आणि युवकांना कळावे, त्यांचा सहभाग वाढावा यासाठी निबंध,घोषवाक्य आणि माहिती परसबाग व्हिडिओ स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
सव्वीस रोपवाटिकांतून रोपे तयार जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या १५ आणि वनविभागाच्या ११ रोपवाटिका आहेत.या रोपवाटिकांमधून देशी आणि स्थानिक प्रजातीची रोपे तयार केली जात असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.
या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी श्रीमती संध्याराणी बंडगर (9922937981) वन विभाग किंवा श्री. संजय भोईटे (9421584619), सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद