Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > ‘मराठी प्रमाणलेखन निश्चितीकरण समिती’ स्थापन

‘मराठी प्रमाणलेखन निश्चितीकरण समिती’ स्थापन

मित्राला शेअर करा

मुंबई. दि. 6 : देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला व अक्षरमाला यामध्ये सुधारणा करण्याच्या आवश्यकतेबाबत पुनर्विचार करण्यासाठी, प्रमाणलेखन निश्चितीकरणासाठी आणि देवनागरी लिपीच्या अभ्यासाला व संशोधनाला चालना देण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.


सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, मराठी पाठ्यपुस्तके इत्यादीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण इत्यादी स्वरुपात केला जातो, त्या ठिकाणी कशाप्रकारे देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला व अंक वापरावेत याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय (दि. ६.११.२००९) अन्वये निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यमान नियम सोपे करण्याबाबत तसेच नियमांत बदल करण्याबाबत सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विभागास कपात सूचना प्राप्त झाली आहे. तसेच मराठी भाषेच्या वर्णमालेतील एकूण वर्ण, व्यंजने, स्वर, स्वरादी यांची संख्या, तत्सम व तत्भव शब्दांबाबतचे नियम इत्यादीमध्ये काही सुधारणा, बदल करणे आवश्यक असल्याचे मत काही शिक्षक, लेखक यांनी शासनाकडे व्यक्त केले आहे. त्यानुषंगाने शासन निर्णयातील बाबीसंदर्भात पुनर्विचार करण्यासाठी तसेच देवनागरी लिपीच्या अभ्यासाला व संशोधनाला चालना देण्यासाठी उपाययोजना  सुचविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.
सदस्यांची नावे :
१) प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई- अध्यक्ष, २) सहसचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई-सदस्य, ३) सहसचिव, (विद्यार्थी विकास) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय-सदस्य, ४) डॉ. अनघा मांडवकर, मराठी भाषा अभ्यासक-सदस्य, ५) डॉ. रेणुका ओझरकर, मराठी भाषा अभ्यासक-सदस्य, ६) श्रीमती लिला गोविलकर, मराठी भाषा अभ्यासक-सदस्य, ७) श्री. बाळासाहेब शिंदे- मराठी भाषा अभ्यासक-सदस्य, ८) श्री. माधव राजगुरु, मराठी भाषा अभ्यासक-सदस्य, ९) श्रीमती सविता वायळ, विशेषाधिकारी, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक संशोधन मंडळ, बालभारती, पुणे-सदस्य, १०) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-सदस्य, ११) अवर सचिव/कक्ष अधिकारी, सदस्य सचिव-सदस्य सचिव
मराठी प्रमाणलेखन निश्चितीकरण समितीची कार्यकक्षा  :

शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक मभावा -२००४ / प्र.क्र.२५/२००४/२०

दि. ०६ नोव्हेंबर, २००९ चा अभ्यास करून त्यामध्ये काही बदल, सुधारणा करणे आवश्यक आहे का हे ठरविणे.

तत्सम व तद्भव शब्दांबाबत नियम सुधारीत करण्याची आवश्यकता आहे का ते तपासणे, वर्णमालेतील वर्णांची संख्या निश्चित करणे.

वर्णमालेतील एकूण वर्ण, स्वर, स्वरादी, व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने यांची संख्या, प्रकार, उच्चारस्थाने निश्चित करुन प्रमाणित वर्णमाला तयार करणे.

“क्ष” आणि “ज्ञ” अशा अक्षरांना कठोर आणि मृदू यापैकी कोणत्या गटात टाकावे ते निश्चित करणे.

देवनागरी लिपीच्या अभ्यासाला व संशोधनाला चालना देण्यासाठी उपाययोजना सुचविणे.

समितीने उपरोक्त मुद्यांबाबत विचारविनिमय करून त्यांच्या शिफारशींसह प्रस्तावित मराठी प्रमाणलेखन निश्चितीकरणाबाबतचा मसुदा तयार करुन समितीच्या अहवालासह ३ महिन्यांत शासनास सादर करावा.

शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२१० ९ २ ९ १६४४५४५४३३ असा आहे.