शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, राज्यातील शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टी.व्ही बसविण्या संदर्भात धोरण ठरविण्यात आले आहे. राज्यात एकूण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सुमारे ६५हजार शाळा आहेत, त्यापैकी सद्यस्थितीत १६२४ शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
उर्वरित शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने सी.सी.टी.व्ही. बसविण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. याकरीता येणारा खर्च जिल्हा नियोजन व विकास निधी (DPDC) / स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी / सी. एस. आर. फंड किंवा लोकसहभागातून तसेच लोकप्रतिनीधींच्या विकास निधीमधून करण्याबाबत सूचना देण्यात येतील.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींकरीता निकोप आणि समतामुल्य वातावरण निर्मितीसाठी व सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी-सावित्री समित्या गठीत करण्याचे निर्देश शासन निर्णय दि. १० मार्च २०२२ अन्वये देण्यात आले आहेत. या समित्या पुढील १५ दिवसात गठित करण्यात येतील.
शाळा स्तरावरील सखी-सावित्री समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, महिला शिक्षक प्रतिनिधी, समुपदेशक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला प्रतिनिधी), पोलीस पाटील, महिला ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला पालक प्रतिनिधी, शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (२ विद्यार्थी व २ विद्यार्थीनी) इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. सखी-सावित्री समितीमार्फत शाळांमध्ये निकोप, समतामुलक व आरोग्यमय वातावरण निर्माण होईल याबाबत काळजी घेण्यात येईल. तसेच सदर समितीला दर महिन्याचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्याची जबाबदारी देण्यात येईल. त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास समिती त्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडे करेल व तक्रारीचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल.
सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत किंवा नाही, सखी-सावित्री समित्यांचे गठण व नियंत्रण याबाबतची जबाबदारी आयुक्त (शिक्षण) यांची राहील.शाळांमध्ये मुलींना मार्गदर्शन करण्याकरीता एका महिला शिक्षकेवर जबाबदारी देण्यात येईल.
पोलीस विभागामार्फत पोलीस स्टेशन पातळीवर पोलीस काका / पोलीस दीदी संकल्पना राबविण्यात आली असून या पोलीस काका व पोलीस दीदींची तसेच सखी-सावित्री समितीतील महत्वाच्या सदस्यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक शाळेच्या दर्शनी भागावर ठळकपणे दर्शविण्यात येतील. राज्यातील आदर्श शाळांमध्ये चांगला स्पर्श-वाईट स्पर्श (Good touch – Bad touch) या संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सदरची मोहीम व्यापक स्वरूपात येणाऱ्या वर्षभरामध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येईल.
अज्ञात व्यक्तींच्या सूचनांचे / निर्देशांचे पालन करू नये याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येईल.प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याच्या सुचना देण्यात येतील.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या नोंदी दोन वेळा म्हणजेच सकाळी आणि शाळा सुटण्याच्या प्रसंगी ठेवण्यात येतील. तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनद्वारे विचारणा करण्यात येईल, असेही मंत्री प्रा. गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर