Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 च्या कामांचा आढावा

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 च्या कामांचा आढावा

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 च्या कामांचा आढावा
मित्राला शेअर करा
अक्षता सोहळा कार्यक्रम स्थानिक केबल नेटवर्कद्वारे लाईव्ह दाखवण्यात येणार

सोलापूर, दिनांक 3:- श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत आहे. सर्व संबंधित शासकीय विभाग तसेच देवस्थान पंच कमिटी यांना कृती आराखड्या प्रमाणे सोपवलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन यात्रा कालावधीत भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा सहज व सुलभ रीतीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीआयपी सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार,पोलिस उपआयुक्त दीपाली काळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सोलापूर महानगरपालिकेच्या अभियंता श्रीमती अकुलवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता विशाल लेंगरे, महानगरपालिकेचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी श्री सिद्धेश्वर महा यात्रा 2025 च्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियमावलीप्रमाणे सर्व संबंधित विभागाच्या जबाबदारी प्रमाणे कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे त्यानुसार सर्व संबंधित विभागानी त्यांची जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. यात्रा कालावधीत येणाऱ्या हजारो भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय सहज दर्शन व्हावे तसेच मनोरंजन नगरीमध्ये त्यांना सहभाग घेता येईल याबाबत काळजी घ्यावी. मनोरंजन नगरीमध्ये नागरिकांना धुळीचा त्रास होणार नाही या अनुषंगानेही महानगरपालिका व देवस्थान कमिटी यांनी योग्य उपाय योजना कराव्यात असेही त्यांनी सूचित केले.

निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी श्री सिद्धेश्वर महायात्रा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागावर सोपविण्यात आलेली जबाबदारी तसेच त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत सादर केली.

श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होत असून दिनांक 12 जानेवारी रोजी 68 लिंग प्रदर्शन, 13 जानेवारी रोजी अक्षता कार्यक्रम, 14 जानेवारी होम हवन असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदीर समिती यांनी दिली. मंदिर समितीच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली तसेच समितीच्या वतीने जवळपास 150 स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अक्षता सोहळा कार्यक्रम जास्तीत जास्त भाविकांना पाहता यावा यासाठी समितीच्या वतीने एलईडी स्क्रीन जागोजागी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच स्थानिक केबल नेटवर्क द्वारे हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.