बार्शी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या ३० बेडचे १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणी वर्धन करणेकामी, प्रशासकीय मान्यतेसाठी अंदाज पत्रक तयार करून त्याचा अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत हे शासनदरबारी पत्रव्यवहार करून, संबंधित खात्याचे मंत्री महोदय व अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून, उपजिल्हा रुग्णालयाच्या मान्यतेसाठी सतत प्रयत्नशील होते.
या संदर्भात आमदार राजेंद्र राऊत यांनी १५ जून २०२१ रोजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांची भेट घेऊन, या विषयावर सविस्तर चर्चा करून, बार्शी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या ३० बेडचे १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणेकामी प्रशासकीय मान्यतेसाठी अंदाजपत्रक तयार करून अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
यानंतर आमदार राजेंद्र राऊत यांच्या सदर भेटीची व पत्राची दखल घेऊन आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांनी २१ जून २०२१ रोजी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत सदर प्रस्ताव घेण्यात आला होता. या बैठकीत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली होती. सदर प्रस्ताव सन २०२१ – २२ मधील अंदाजपत्रकात मुख्य लेखाशिर्ष ४२१० वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्यावरील भांडवली खर्च ०१, नागरी आरोग्य वैद्यकीय सहाय्य मध्ये समाविष्ट करण्याचे आदेश २८ जून २०२१ रोजी अवर सचिव महाराष्ट्र राज्य यांनी पारित केले होते.
या सर्व घटना क्रमानंतर बार्शीच्या उपजिल्हा रुग्णालयाकरीता आज महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय विवरण पत्रिकेत, इमारत बांधकाम करणेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.
बार्शीमध्ये नव्याने होणाऱ्या 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे बार्शी शहर व तालुक्यातील गोर-गरीब व गरजू रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा व उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
बार्शीच्या या उपजिल्हा रुग्णालया करिता २० कोटी ८३ लाख ४८ हजार ७४५ रुपये मंजूर करून, त्यापैकी १ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांचे तालुक्याच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार व्यक्त केले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ