कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे एक विशेष शैक्षणिक व समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बार्शीपुत्र आणि विद्यापीठातील NSS विभाग प्रमुख सुजित अर्जुन मुंढे लिखित ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

या समारंभास विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. अभयसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, मानव्यशास्त्र अधिष्ठाता डॉ. एस. एम. देशमुख, विधी अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही. वाय. धूपदाळे, सुदर्शन देसाई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मुंढे यांच्या कार्याचे कौतुक करत असे मत व्यक्त केले की, “समाजात कायद्याचे महत्त्व, त्याचे आकलन आणि अंमलबजावणी या प्रक्रियेत जनतेचा सक्रीय सहभाग अत्यावश्यक आहे. यासाठी संशोधनाधारित व अभ्यासपूर्ण साहित्याची आवश्यकता आहे. कायदे काळानुसार बदलतात, म्हणून फक्त फौजदारी नव्हे, तर शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक कायद्यांचा सुद्धा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. विशेषतः विद्यापीठ कायद्यांवरही संशोधन व सूचना व्हाव्यात.”

लेखक सुजित अर्जुन मुंढे यांनी सांगितले की, “पोलीस प्रशासन व नागरिक यांच्यातील संबंध अधिक प्रभावी होण्यासाठी कायद्याची अचूक व सुलभ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. या पुस्तकात १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू होणाऱ्या भारतीय न्याय संहिता २०२३ आणि जुन्या भारतीय दंड संहिता १८६० यामधील महत्त्वाच्या बदलांचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. याशिवाय, CCTNS (Crime and Criminal Tracking Network System) प्रणाली आणि विविध राज्य/केंद्रशासित पोलीस पोर्टल्सवरील नागरिक सेवा यांचा आढावा ग्रंथात घेतला आहे. हे पुस्तक नागरिक, विद्यार्थी, अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी आणि कायदेतज्ज्ञांसाठी उपयुक्त ठरेल.”
मान्यवरांनी या पुस्तकाचे कौतुक करताना नमूद केले की, यामध्ये कायदा, प्रशासन आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधण्यात आला आहे. यामुळे कायदा साक्षरतेबरोबरच नागरिकांची जबाबदारी, पोलीस प्रशासनातील पारदर्शकता आणि डिजिटल सक्षमीकरण यास चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास विद्यापीठातील विविध अधिष्ठाते, विभागप्रमुख, प्राध्यापक, संशोधक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी, उत्साही व ज्ञानवर्धक वातावरणात पार पडला.
More Stories
कलाशिक्षक संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक