शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा तसेच उत्पन्न वाढण्यासाठी, उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ व भाव मिळण्यासाठी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत भगवंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत बाजार समिती आवारात ०९ ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आयोजित केलेल्या कृषि महोत्सवाचा समारोप सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे उपस्थितीत संपन्न झाला.
आमदार राजाभाऊ राऊत म्हणाले की कृषी महोत्सव शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा उपक्रम असून अशा उपक्रमांमधून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञाना विषयी माहिती,हवामानाविषयी माहिती, माती परीक्षण, खताचा वापर कसा करावा याची माहिती महोत्सवातून मिळत असते. बार्शी बाजार समितीच्या माध्यमातून आयोजित केलेले भगवंत कृषी महोत्सवात विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळाली त्याबद्दल बार्शी बाजार समितीचे आभार मानले.
भगवंत कृषी महोत्सवाला अपेक्षा पेक्षाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कृषी महोत्सव यशस्वीपणे पार पडला असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
सुरुवातीला सभापती रणवीर राऊत यांनी कृषी महोत्सवातील सर्व साधनांची माहिती दिली महोत्सवात लावण्यात आलेल्या 300 पेक्षा जास्त स्टॉलवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भेटी दिल्या पाच दिवस चाललेल्या या कृषी महोत्सवामध्ये १ लाखांपेक्षा जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवात भेट दिल्याची माहिती दिली.
पाच दिवसीय कृषी प्रदर्शनात लहरी हवामान याविषयी पंजाबराव डख, फळछाटणीनंतर द्राक्ष वेलीचे व्यवस्थापन या विषयावर डाॅ. आर. जी. सोमकुंवर, आदर्श गोठा व्यवस्थापन या विषयावर डॉ. नितीन मार्कंडेय, महीला मेळावा व कृषीरत्न सीताबाई मोहिते, एकरी शंभर टन ऊस उत्पादन सहज शक्य या विषयावर कृषिभूषण संजीव माने या सर्व मान्यवरांचे परिसंवाद पार पडले. कृषी प्रदर्शनात कृषी प्रदर्शनाबरोबरच कृषी औजारांच्या प्रात्यक्षिकांसाठी विशेष क्षेत्र, देशी गायींचे प्रदर्शन,लघुउद्योग क्षेत्रातील उद्योगांचे विशेष दालन व महिला बचत गटांचे विशेष दालन, ३०० पेक्षा जास्त स्टाॅल,पिक स्पर्धा व पारीतोषिके, विशेष चर्चासत्रे, डाॅग शो तसेच विविध कृषी उपयोगी साधने यांचा समावेश करण्यात आलेला होता. यामध्ये सरकारी योजनांची माहिती देणारे जिल्हा परिषदेचे, कृषी विभागाचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व कृषी विद्यापीठाचे स्टॉल्स याबरोबरच बी-बियाणे, कीटकनाशक, रोपवाटिका, ट्रॅक्टर, मशागतीचे यंत्र, ठिबक सिंचन, गृहउपयोगी वस्तूचे व महिला बचत गटांचे स्टॉल्स लावलेले होते.
आमदार सचिन कल्याण शेट्टी,आमदार राजाभाऊ राऊत,आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक,भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी,नगरसेवक पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ