कोरडवाहू भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देत त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना” योजना शासनाने सुरू केली आहे.
कमी पाऊस पडणाऱ्या भागात पीकांसाठी सिंचनाची सुविधा महत्वाची आहे. केवळ पावसावर अवलंबून न राहता पाईप, कालवे, फवारे किंवा इतर मानवनिर्मित साधनांमधून पाणी आणून पिकांना पाणी दिल्यास शाश्वत उत्पन्न घेता येते. विशेषत: ठिबक व तुषार सिंचन शेतकऱ्यांना अधिक लाभदायी ठरते.
कमी पाण्यात शेतकऱ्याला भरघोस उत्पादन घेता यावे व पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर शेतकऱ्यांना व्हावा यासाठी सूक्ष्म सिंचन योजना राबविल्या जातात. राष्ट्रीय कृषि विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी शेतकऱ्यांना 90 टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येते.
ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत 55 टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत 25 टक्के असे एकूण 80 टक्के अनुदान देण्यात येते. तसेच बहूभूधारक शेतकऱ्यांना 45 टक्के व 30 टक्के असे एकूण 75 टक्के अनुदान देण्यात येते.
राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत 35 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदान ठिबक व तुषार सिंचनाचे संच बसवण्यासाठी देण्यात येते. तर बहु भूधारक शेतकऱ्यांनाही दोन्ही योजनेतून 45-45 टक्के असे एकूण 90 टक्के अनुदानाचा लाभ दिला जातो.
योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेतून ठिबक व तुषार सिंचन संच बसवण्यासाठी महाडिबीटी संकेतस्थळावरुन 24×7 अर्ज प्रक्रिया सुरु आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून हार्डकॉपी सादर करण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन सोडत असल्याने प्रक्रीया संपूर्णपणे पारदर्शी आहे. योजनेअंतर्गत 5 हेक्टरपर्यंत लाभ मर्यादा राहील. शेतकऱ्यांच्या आधार जोडणी केलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान थेट जमा होते. केंद्राच्या सुधारित खर्च मर्यादेप्रमाणे सर्व पिकांसाठी अनुदान उपलब्ध होते.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतून सूक्ष्म सिंचन संचासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. तर अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन