Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची महिलांसाठी लोकशाही भोंडला स्पर्धा

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची महिलांसाठी लोकशाही भोंडला स्पर्धा

मित्राला शेअर करा

सोलापूर, दि.12: लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याआधी त्यांची ताकद लक्षात घेऊन यंदा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने लोकशाही भोंडला ही स्पर्धा आयोजित केली आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत आपले साहित्य स्पर्धेसाठी पाठविणे आवश्यक आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली आहे .

भोंडल्यांच्या गीतामध्ये माहेर हे सुखाचं तर सासर कष्टाच असत. माहेरची नाती ओढ लावणारी तर सासरची नाती द्वेषाची असतात. आधुनिक स्त्रीला कामाच्या धबडग्यात तिची मतदार म्हणून नाव नोंदणी किंवा लग्नानंतर झालेल्या नावात बदल करणं, यासारख्या कामात चालढकल करावी लागते, या गीताच्या माध्यमांतून तिला यासाठी प्रेरित करणाऱ्या गीतरचना या स्पर्धेसाठी करता येतील.

लोकगीतांच्या अंगभूत लवचिक स्वरुपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रींचं गुंफणंही सहज शक्य आहे. हे मानस गुंफताना तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसं व्हाव, हे सांगता येईल. तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने, लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून गावाच्या-देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असे आवाहनही या भोंडला गीतांतून करता येईल.

स्पर्धेची नियमावली
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. एकल (सोलो) किंवा समूह दोन्ही प्रकारची गीते पाठवता येतील. समुह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरावा. लोकशाही, निवडणूक, मताधिकार या विषयांशी संबंधित भोंडला गीत गाऊन त्याची ध्वनिचित्रफीत व्हिडिओ पाठवावी. गाण्यासोबत भोंडल्याचा नाच असेल तरी चालेल. एका स्पर्धकाने किंवा समूहाने एकच गीत पाठवावे. आपल्या गीताची ध्वनीचित्रफीत पाठवताना, ती कमीत-कमी दोन मिनिटांची आणि जास्तीत- जास्त चार मिनिटांची पाठवावी. ध्वनीचित्रफीतीची (व्हिडिओची) साईज जास्तीत जास्त 300एमबी असावी. तसेच ही ध्वनीचित्रफीत एमपी4 फॉरमॅटमध्ये असावी. स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या विषयावर भोंडला गीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल. आपली ध्वनीचित्रफीत

https:forms.gle/G8TSjHyFN9hzatzH9

या गुगल अर्जावरील माहिती भरुन त्यावर पाठवावेत.

स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर 8669058325 यांच्या या व्हॉटस्ॲप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. 7 ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आलेले साहित्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

बक्षिसांचे स्वरुप- प्रथम-अकरा हजार रूपये, द्वितीय क्रमांक- सात हजार रूपये, तृतीय क्रमांक – पाच हजार रूपये आणि उत्तेजनार्थ एक हजार रूपयांची दहा बक्षिसे आहेत.

लोकशाही निवडणूक मताधिकार विषयाशी संबंधित साहित्य पाठविणाऱ्या सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. आलेल्या भोंडला गीतातून सर्वोत्तम गीते निवडण्याचा अंतिम निर्णय परिक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकांनी पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल. स्पर्धतील उत्कृष्ठ साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.

जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.