Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > सहसंपर्कप्रमुख खोचरे यांचा ‘मातोश्री’ला जय महाराष्ट्र; शिंदे सेनेत जाहीर प्रवेश! निष्ठावंतांना मातोश्रीवर न्याय मिळत नसल्याची खंत

सहसंपर्कप्रमुख खोचरे यांचा ‘मातोश्री’ला जय महाराष्ट्र; शिंदे सेनेत जाहीर प्रवेश! निष्ठावंतांना मातोश्रीवर न्याय मिळत नसल्याची खंत

सहसंपर्कप्रमुख खोचरे यांचा ‘मातोश्री’ला जय महाराष्ट्र; शिंदे सेनेत जाहीर प्रवेश! निष्ठावंतांना मातोश्रीवर न्याय मिळत नसल्याची खंत
मित्राला शेअर करा

धाराशिव – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता सर्वसामान्य शिवसैनिकाला मातोश्रीवर न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उभी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. खोचरे यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशामुळे ठाकरे सेनेला जबरदस्त धक्का बसला असून जिल्ह्यात आता ढाल-तलवारीची ताकद आणखी वाढणार आहे.

मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, उमरगा-लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, मुख्य प्रवक्ते किरण पावसकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी श्री.खोचरे यांचे पक्षात स्वागत केले.

1990 च्या दशकात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रभावित झालेले अनिल खोचरे हे विद्यार्थी दशेपासूनच शिवसेनेत सक्रिय झाले. विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर घेत तरुणांचे संघटन बांधून सामाजिक प्रश्नावर मोर्चे, आंदोलने करुन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून शिवसेनाच न्याय देऊ शकते हा विचार सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी रुजविला. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे गावागावात शिवसेनेच्या शाखा स्थापन होऊन शिवसैनिकांची मोठी फळी सक्रिय झाली. दरम्यानच्या काळात 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची धुरा खोचरे यांच्यावर सोपविली. दिलेल्या जबाबदारीला शिरसावंद्य मानून ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विविध संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला सत्तेत स्थान मिळवून देत धाराशिवला शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण करुन दिली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धा, पर्यावरण संवर्धनासाठी धाराशिव जिल्ह्यात हेलिकॉप्टरद्वारे सीडबॉल पेरणी, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम, शिबिरे घेऊन सामाजिक कार्यातही गेल्या 32 वर्षात त्यांनी ठसा उमटवला आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता वेळोवेळी पक्षहितासाठी श्रेष्ठींच्या आदेशानुसार माघार घेतली. शिवसेनेसाठी जीवाचे रान करुनही बाळासाहेबांच्या निधनानंतर सतत उपेक्षाच वाट्याला येत असल्यामुळे लढयय्या, कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असलेले सहसंपर्कप्रमुख श्री. खोचरे यांनी मातोश्रीला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. त्यांच्या या प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात ठाकरे सेनेला जबरदस्त हादरा बसला आहे तसेच आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत आहेत.