सोलापूर, दि.16 : माझ्या वकिली व्यवसायामध्ये कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान आहे. तरूण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यावसायात सुरूवातीला अनंत अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत रहा, असे आवाहन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी केले. महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलची राज्यस्तरीय वकील परिषद सोलापूर येथे संपन्न झाली. यावेळी सोलापूरचे सुपूत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेत सरन्यायाधीश श्री. लळित बोलत होते. यावेळी सोलापूरचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतल्याने त्यांचा सोलापूरकरांच्या वतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकूर दत्ता, सोलापूरचे रहिवासी असलेले न्यायाधीश एम. एस. कर्णिक, एन. जे. जमादार, विनय जोशी, राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे आदी उपस्थित होते.
सरन्यायाधीश श्री. लळित यांनी सोलापूर ही माझी जन्मभूमी आहे. याठिकाणी माझे शालेय शिक्षण झाले. जन्मगावाचे ऋणानुबंध कायम आहेत, इथले दोस्त, वर्गमित्र यांच्याशी आजही संपर्कात आहे. मी 39 वर्षे वकिली व्यवसायात आहे. मला वकिली व्यवसातून उदंड किर्ती, मान, पैसा सर्व मिळाले. आता सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी जे आहे ते परत करायचे आहे. वकिलांनी मूल्यांची शिदोरी घेऊन स्वत:वर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावे, अडथळे पार होतील. आज निम्म्याहून जास्त युवांची संख्या देशात आहे. येणाऱ्या काळात युवकांच्या हातात देश असेल.
ग्रंथालय आणि पुस्तकांचा आधार घेवूनच आम्ही शिखर गाठले, सध्या इंटरनेटच्या जमान्यात तुम्हाला संशोधन, अभ्यासासाठी प्रचंड साधने आहेत. युट्यूबसुद्धा तुम्हाला वकिलांचा युक्तीवाद पाहायला मिळेल, सदैव सचोटीने काम करा, कक्षा भव्य आहेत, असेही सरन्यायाधीश श्री. लळित यांनी सांगितले.
सोलापूरचे चार रत्न-सुशीलकुमार शिंदे
माजी केंद्रीय मंत्री श्री. शिंदे म्हणाले, वकिलांनी न्यायालयात न घाबरता वादविवाद करून सामान्य नागरिकांना न्याय द्यावा. सोलापूरच्या मातीतल्या माणसाने न्यायव्यवस्थेत आपला ठसा उमटवल्याने सोलापूरकरांचा उर भरून येतो. चार हुतात्मा यांच्या पद्धतीने सोलापूरचे चार रत्न…उदय लळित, विनय जोशी, एन. जे. जमादार आणि आशितोष कुंभकोणी आहेत. सर्वांनी सामाजिक न्यायासाठी योगदान द्यावे. बार कौन्सिलमधून खेड्यातील, मागास समाजातील वकिलांनी मदत करावी. जिल्ह्यातून आणखी एक मुख्य न्यायाधीश तयार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी केली.
श्रमाशिवाय ज्ञान वाढणार नाही-दिपांकूर दत्ता
श्री. दत्ता यांनी मराठीतून सर्वांना शुभेच्छा दिल्या. सरन्यायाधीश लळित यांच्या आठवणी, न्यायालयात ताकदीने आपली बाजू मांडणारे, सामान्यांना न्याय देणारे ते आहेत. नवोदित वकिलांनी सर्व कायद्यांचा अभ्यास काळजीपूर्वक करून कायदे जाणून घ्यावेत. श्रमाशिवाय आपले ज्ञान वाढणार नाही. जीवनाला महत्व देवून नम्रतेने भाषेवर प्रभूत्व वाढवावे, असे न्यायाधीश श्री. दत्ता यांनी सांगितले.
पैशासाठी वकिली करू नका-आशितोष कुंभकोणी
सोलापूरचा माणूस न्याय व्यवस्थेच्या मुख्य स्थानावर पोहोचला, याबाबत नितांत अभिमान आहे. विनम्र स्वभाव, संयमी वृत्तीचे, कोणालाही अपशब्द न बोलणारे, चौकटीबाहेर विचार करणारे सरन्यायाधीश लळित आहेत. त्यांचे गुण नवोदित वकिलांनी घ्यावेत. नवोदितांनी पैशासाठी वकिली करू नये, पैशाकडे लक्ष न देता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करा, असे आवाहन श्री. कुंभकोणी यांनी केले.
बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य जयंत जायभावे यांनी प्रामाणिकपणाला महत्व देऊन समाजाला न्याय द्यावा.निष्पक्ष न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले.
वकील परिषदेचे उदघाटन श्री. लळित यांनी केले. ॲड. थोबडे यांनी प्रास्ताविकातून बार कौन्सिलची माहिती आणि कार्याचा आढावा घेतला. बार कौन्सिलतर्फे शिक्षण, कार्यक्रमांची शिबीरे घेऊन नवोदित वकिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 15 वर्षात 500 शिबीरे घेतली, ज्यांना बार आणि बेंचची आवड त्यांना मार्गदर्शन केले. महिला दिनाला महिलांविषयी गुन्हे याबाबत शिबीर घेऊन जागृती केली. बार कौन्सिलचे डिजीटायजेशन केले असून सर्वांना यामार्फत सेवा दिली जाणार आहे, असे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ई-गव्हर्नन्सचे प्रकाशन केले. श्री. लळित यांच्या हस्ते बार कौन्सिलच्या डिजीटायजेशनचे कळ दाबून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी लळित कुटुंबातील सदस्य सविता लळित यांनी लळित कुटुंबातील चार पिढ्या वकिलीमध्ये असल्याचे सांगितले. यावेळी सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, सरन्यायाधीश यांचे वडील निवृत्त न्यायमुर्ती उमेश लळित, पत्नी अमिता लळित, श्रीमती झूमा दत्ता, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा आदींसह वकिल उपस्थित होते.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन