पुणे, दि.३१डिसेंबर२०२५ : महिलांना सामाजिक विषय हाताळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने नव्या वर्षात विशेष कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सरत्या वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि नव्या वर्षाचे नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, महिलांना सक्षम व आत्मविश्वासपूर्ण बनवण्यासाठी २०२६ मध्ये संवाद कौशल्यावर विशेष भर दिला जाईल. सामाजिकदृष्ट्या अवघड विषय कसे हाताळावेत, संवाद साधताना कोणती काळजी घ्यावी यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्त्री आधार केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत विविध उपक्रम राबवत असून, नव्या वर्षातही हे उपक्रम अधिक जोमाने सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, ॲड. सुवर्णा कांबळे, अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे, रंजना कुलकर्णी, अनिता परदेशी, प्रज्वला ओव्हाळ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सरत्या वर्षातील उपक्रमांना महिलांनी गुणांकन देताना प्रशिक्षण कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शन, केसवर्क, ऑनलाइन बैठका तसेच मुंबई–पुणे मेळावे यांना विशेष पसंती दर्शवली.
२०२६ मध्ये पोलीस प्रशिक्षण, महिलांशी संवाद कौशल्य, रोजगार संधी, स्त्री आरोग्य, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायद्याविषयक प्रशिक्षण या विषयांवर विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत.
बैठकीदरम्यान महिलांना दोन गटांत विभागून चर्चा घडवून आणण्यात आली. पहिल्या गटाने “बाह्य सौंदर्य” या विषयावर मत व्यक्त करताना आंतरिक सौंदर्य, विचारांची सकारात्मकता, सुसंस्कृत आचार-विचार, सहकार्य, मैत्रीभाव आणि एकमेकांना मदत करण्यावर भर दिला. दुसऱ्या गटाने “काम करताना होणारा विरोध” या विषयावर चर्चा करताना वेळेची अडचण, दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळण्याचे आव्हान तसेच विनाकारण त्रास देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी घोषणा केली की, *३ जानेवारी २०२६, शनिवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मा. सावित्रीबाई फुले यांच्या शिल्पास सकाळी ११.३० वा पुष्पहार अर्पण केला जाईल. नंतर मा.बाळासाहेब ठाकरे कलादालन , सारस बाग, पुणे येथे १२.१५ ते १.३० या वेळेत ‘महिला प्रशिक्षणाची गरज’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्त्री आधार केंद्राच्या या उपक्रमांमुळे महिलांना सामाजिक क्षेत्रात अधिक सक्षमपणे व आत्मविश्वासाने पुढे येण्यास निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नवीन वर्षाच्या या सकारात्मक सुरुवातीमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला नवे बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
More Stories
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत “आयुष्मान वय वंदना” योजना
आई, संत, भगवंत ही तीन माणसे सोडली तर या जगात सगळी माणस स्वार्थी आहेत ह.भ.प. इंदोरीकर महाराज