Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन
मित्राला शेअर करा

सोलापूर,दि.21 : मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम 1ऑगस्ट 2022 पासून राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवून आधार क्रमांक मतदान ओळखपत्राशी जोडून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी आज सांगोला आणि मंगळवेढा तालुका दौरा केला. सांगोला तालुक्यातील वाकी, घेरडी येथील मतदान केंद्राना भेटी देवून पाहणी केली. पंचायत समिती सभागृहात केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची आढावा बैठक घेतली. आधारकार्ड मतदान ओळखपत्राशी जोडण्याची मोहीम प्रभावीपणे राबवून 10 दिवसात काम संपविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार अभिजित पाटील उपस्थित होते.

दरम्यान श्री शंभरकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ, गोणेवाडी, शिरसी येथील मतदान केंद्राना भेटी देवून माहिती घेतली. तसेच 1500 पेक्षा जास्त मतदार असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि नगरपालिका शाळेतील मतदान केंद्राची पाहणी करून मतदार संख्या कमी करण्याविषयी सूचना केल्या. यावेळी प्रांतधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, तहसीलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते.

पाहणीनंतर तहसील कार्यालयात महसूल अधिकारी, बीएलओ यांची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी निवडणूक आयोगातर्फे मतदान ओळखपत्र आधार कार्डाशी लिंक करण्याची विशेष मोहीम सुरु केली आहे. बैठकीत उपस्थित ग्रामस्थांचे श्री शंभरकर यांनी स्वतः आधार लिंकिंग करवून घेतले.

मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, निवडणूक मतदानासंबंधीची विद्यमान माहिती व आयोगाकडून वेळोवेळी प्रसारित होणाऱ्या सूचना मतदाराला मोबाइलद्वारे अवगत करणे यासाठी मतदारांच्या मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक केले जाणार आहे. १ ऑगस्टपासून विशेष मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्र. ६ ब तयार करण्यात आला आहे. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ईआरओ नेट, गरुडा, एनव्हीएसपी व वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲप या माध्यमांवरदेखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र ६ ब व्दारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी घरोघरी भेटी देऊन अर्ज क्र ६ ब भरून घेऊन त्यांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. ६ ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र यासह 11 पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.

मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक लिंक करण्याच्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.

मतदार स्वतःही करू शकणार आधार कार्ड लिंक
National Voter Service Portal

https://www.nvsp.in/

या संकेतस्थळावर Voter Helpline APP वरही ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड लिंक करून स्वप्रमाणित करता येईल. हा अर्ज भरताना मतदाराला आधार कार्डाला संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. याद्वारे मतदान ओळखपत्र लिंक करता येईल.

आधार कार्डावरील क्रमांक गुप्त ठेवता येणार आधार क्रमांक

नमूद केलेले प्रत्यक्ष आणि संगणकीकृत दस्तावेज दुहेरी कुलूपबंद ठेवले जातील आणि आधार क्रमांकाची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी आधार कार्डावरील क्रमांक लपविण्याची तरतूद केली असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.