धाराशिव,दि.२ जुलै (जिमाका) जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी जिल्ह्यातील २० पेक्षा अधिक खाटांची रुग्णालये आणि विशिष्ट १० खाटांची एकल विशेषता रुग्णालये यांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) मध्ये समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

पात्र एकल विशेषता रुग्णालयांमध्ये खालील उपचार क्षेत्रांचा समावेश आहे.यामध्ये नाक,कान,घसा (ENT) नेत्रविकार (Ophthalmology),
अस्थिव्यंग व पोलिट्रॉमा,भाजलेले रुग्ण (Burns),बालरोग शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार युनिट्स,नवजात व बालरोग वैद्यकीय युनिट्स, हिमोडायलिसिस (नेफ्रॉलॉजी) युनिट्सचा समावेश आहे.
एकत्रित आयुष्यमान भारत : केंद्र शासनाची ही योजना आहे,ज्यामध्ये दरवर्षी ५ लाखांपर्यंत मोफत उपचार आणि १३५६ आजार-शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना : महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे.यामध्येही ५ लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा देण्यात येते.
पात्र रुग्णालयांनी https://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा रुग्णालय, धाराशिव (दूरध्वनी: ८२७५०९५९०६) किंवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने सर्व पात्र रुग्णालयांना या योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले असून,यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार व मोफत वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
More Stories
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन