Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > वडाळा येथील न्यू हायस्कूलमध्ये प्रथमच नागपंचमी साजरी

वडाळा येथील न्यू हायस्कूलमध्ये प्रथमच नागपंचमी साजरी

मित्राला शेअर करा

भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे : डॉ.वैशाली साठे

उत्तर सोलापूर – चल ग़ सये वारुळाला नागोबा पूजायाला…. तुझ्या पिंग्यान मला बोलावलं रात जागवली पोरी पिंगा…ही नागपंचमीची गाणी आता शिकल्या सवरल्या लेकींपासून दूरावत आहेत.त्यामुळे भाऊ बहिणीच्या जिव्हाळ्याच्या नात्यातील मायेचा झरा आटत आहे.सुशिक्षितपणा अन् आधुनिकीकरणामुळे भारतीय संस्कृती लोप पावत आहे, मात्र ती टिकून रहावी, यासाठी वडाळा येथील न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैशाली जितेंद्र साठे यांनी यंदा प्रथमच प्रशालेत विद्यार्थिनींसमवेत नागपंचमीचा सण साजरा केला.

शाळेतील काही मुलींना साडी नेसून यायला सांगितले.तर लहान मुलींना घागरा घालून यायला सांगितले.मुलीही साडी नेसून,अंबाडा घालून अन् अंबाड्यात गजरा माळून,हातावर मेहंदी,नख पाॅलीश लावून नटूनथटून आल्या होत्या.

सुरुवातीला प्राचार्या डॉ.वैशाली साठे यांनी विद्यार्थिनींना नागपंचमीच्या सणाचे महत्त्व सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या,” आपली भारतीय संस्कृती खूप महान असून प्रत्येक सणाला निसर्ग व विज्ञानाची सांगड घातली आहे.नाग ही देवता आहे.शिवाय तो शेतकऱ्यांचा चांगला मित्रही आहे.त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. आपले भारतीय सण, संस्कृती याबद्दल परदेशी लोकांना आकर्षण आहे. आपण मात्र सुधारणेच्या नावाखाली आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत. नागपंचमी दिवशी उकडीचे पदार्थ खाण्यामागेही आहारशास्त्र आहे.तर झोका खेळल्यामुळे श्वासोच्छवास नियंत्रित राहून श्वसन यंत्रणा निरोगी राहण्यासाठी मदत होते.तेव्हा आपले सण व उत्सव पूर्वीप्रमाणे मोठ्या उत्साहात व एकरुप होऊन साजरे केले पाहिजेत.त्यामुळे दुरावत चाललेल्या नात्यांची वीण घट्ट होईल.”

विद्यार्थीनींनी पंचमीची गाणी म्हटली.फेर धरला. शाळेत झाडाला मोठा झोकाही बांधला होता.दररोज ज्ञानाचे धडे गिरवित असलेल्या शाळेत मनसोक्त झोक खेळला.काही मुलींनी पिंगा चढवला. विद्यार्थिनींसोबत प्राचार्या डॉ.वैशाली साठे देखील नागपंचमीच्या सणात तल्लीन झाल्या होत्या. डॉ.वैशाली साठे यांनी नुकतीच न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा हाती घेतली. शाळेच्या सत्तर वर्षांच्या इतिहासात प्रथमच डॉ.वैशाली साठे यांच्या रुपाने महिला मुख्याध्यापिका, प्राचार्या मिळाल्या.त्यामुळे शाळेत विद्यार्थिनींनी नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली.