Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
मित्राला शेअर करा

*कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व ठेकेदारांनी त्यांच्याकडील कामगारांची संख्या व माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी
*महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे कामगार म्हणून नोंदणीसाठी कामगारांना संबंधित ठेकेदाराकडून 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक

सोलापूर, दि. 12:- कामगार विभाग अंतर्गत कामगाराच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे असंघटित क्षेत्रातील कामगारांची नवीन नोंदणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रमुखांनी त्यांच्या विभागाची कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या तालुका निहाय बैठका घेऊन त्यांच्याकडून कामगारांची संख्या व त्यांची माहिती घ्यावी. जेणेकरून अशा कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे सुलभ होणार आहे. सर्व संबंधित विभागांनी सामाजिक बांधिलकी ठेवून या कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे नोंदणी करण्याच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकंदे, सहायक कामगार आयुक्त श्री. गायकवाड, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, जिल्ह्यात एकूण बाराशे ठेकेदार असून त्यांच्याकडे हजारोच्या संख्येने कामगार असू शकतात त्या कामगारांची संख्या व माहिती प्रशासनाला उपलब्ध होण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी तालुका व विभाग स्तरावर ठेकेदारांच्या बैठका घेऊन त्यांच्याकडून माहिती उपलब्ध करून घ्यावी. संबंधित कामगार आयुष्यमान भारत कार्ड, पोर्टेबल रेशन कार्ड, पीएम जीवन ज्योती बीम योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आदी योजनांचा लाभ घेत आहेत का याची माहिती घ्यावी. जे कामगार योजनांचा लाभ घेत नाहीत अशा सर्व कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या संकेतस्थळावर नव्याने नोंदणी करून उपरोक्त योजनेचा लाभ देणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा व सर्व संबंधित ठेकेदार यांनी असंघटित क्षेत्रातील कामगाराप्रती सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांची माहिती व्यवस्थितपणे एकत्रित करून प्रशासनाला सादर करावी. सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी तालुका व विभाग स्तरावरील बैठकामध्ये उपस्थित राहणाऱ्या ठेकेदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना कामगारांची संख्या व त्यांची माहिती ही कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी असल्याचे सुचित करावे. त्यानंतरही जिल्ह्यातील जे ठेकेदार कामगारांची संख्या व माहिती देणार नाहीत अशा ठेकेदाराविरोधात सामाजिक सुरक्षा कायदा 2008 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निर्देश ही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल श्री नाटेकर यांनी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यालय जिल्हा परिषद यंत्रणा सोलापूर महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका या सर्व यंत्रणांकडे जवळपास 1200 ठेकेदार यांची नोंद आहे व त्यांनी कळविलेली कामगारांची संख्या 3762 इतकी आहे. परंतु कामगार मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांची संख्या नगण्य असून सर्व यंत्रणांनी अत्यंत गतीने कामगारांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीसाठी कामगारांना बांधकाम कामगार म्हणून 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड महत्त्वाचे असल्याची माहिती कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. गायकवाड यांनी दिली.