Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > म्युकरमायकोसिस प्राण घातक रोगाविषयी संशोधन कार्यास जर्मन पेटंट

म्युकरमायकोसिस प्राण घातक रोगाविषयी संशोधन कार्यास जर्मन पेटंट

म्युकरमायकोसिस प्राण घातक रोगाविषयी संशोधन कार्यास जर्मन पेटंट
मित्राला शेअर करा

बार्शी येथील सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी व अभ्यासिका डॉ. अमृता शेटे-मांडे यांनी कोरोनाच्या अत्यंत भयावह काळात म्युकर मायकोसिस या उद्भवलेल्या प्राणघातक रोगावरती केलेलं संशोधन समाजासाठी उपयुक्त ठरले होते. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने त्यांच्या संशोधनाची दखल घेत त्यांच्या संशोधनाच्या आधारे अमृता शेटे-मांडे यांना पी. एचडी. पदवी प्रदान केलेली आहे. या त्यांच्या संशोधनच्या पद्धतीला व त्यावर आधारित ॲन्टीफंगल उत्पादनाच्या डाॅ. आरती कांबळे यांच्या संयुक्त कार्यास ‘सिस्टीम फॉर द प्रोडक्शन ऑफ ॲन्टीफंगल सबस्टन्स फ्रॉम स्ट्रेप्टोमायसीस फ्लेवोव्हीरीड्स एके-२’ या विषयावरती आता जर्मन पेटंट प्राप्त झाले आहे.

म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीमुळे होणारा रोग असून रुग्णाचे डोळे, मेंदू व फुफ्फुसावर परिणाम करतो.कोरोना काळात हा रोग मोठ्या प्रमाणात पोस्ट कोव्हिड रुग्णांमध्ये आढळून आला होता.या रोगाची उपचार पद्धती अत्यंत महाग असल्याने जीवघेणा ठरलेला आहे. आम्फोटेरिसिन-बी हे एकमेव इंजेक्शन उपयुक्त ठरले होते.

या संशोधकांनी रोगाच्या बुरशीला घातक अशा औषध निर्मिती करणाऱ्या जंतूचा शोध लावून पर्याय उपलब्ध करून दिला. सदर बुरशी नाशक औषध तयार करण्यासाठी या जंतूची प्रयोग शाळेत वाढ करावी लागते. त्यासाठी विशिष्ट पद्धत अवलंबवावी लागते. याच जंतूच्या प्रयोगशाळेत वाढवाव्या लागणाऱ्या पद्धतीला पेटंट मिळाले आहे. त्यामुळे बुरशीनाशक औषध निर्मितीतील स्वामीत्वाचा पहिला टप्पा पार केल्याचे व त्यामुळे कमी खर्चात म्युकरमायकोसिस या रोगावर उपचाराची शक्यता बळावली असल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

कोणी केले संशोधन

डॉ. सुहास कुलकर्णी हे निवृत्त प्रोफेसर असून, त्यांच्या नावावर 50 हून अधिक रिसर्च पेपर्स, 15 शोध, 2 एम. फील, 8 पी. एचडी, 3 प्रोजेक्ट, 12 पुस्तकातील लिखाण जमा आहे.

सौ. अमृता शेटे मांडे या पी. एचडी. असून सध्या त्या श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे कार्यरत आहेत. त्यांचेही 3 रिसर्च पेपर्स, 4 प्रोजेक्ट प्रसिद्ध झाले आहेत.

डाॅ. आरती कांबळे (सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड) यांचे 9 रिसर्च पेपर्स, 10 रिसर्च प्रोजेक्ट, 3 पुस्तके प्रकाशित आहेत व 3 अंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहेत. तसेच या संशोधन कार्यात डाॅ. अश्विनी कोळी (अमृतेश्वर महाविद्यालय,विंझर, पुणे) यांचा ही सहभाग आहे त्यांचे 7 पेपर्स आहेत.

तिघीही सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका व संशोधिका आहेत. बार्शीतील या सर्व संशोधकांच्या यशाबद्दल समाजाच्या सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.