Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > राष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत बार्शीतील कसपटे यांचा समावेश

राष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत बार्शीतील कसपटे यांचा समावेश

राष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत बार्शीतील कसपटे यांचा समावेश
मित्राला शेअर करा

बार्शीतील मधूबन फार्म आणि नर्सरीचा देशातील उत्कृष्ट उद्योजकांच्या यादीत समावेश झाला असून मुंबईत शुक्रवारी (दि.१५) झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे पार पडलेल्या दिमाखदार राष्ट्रीय सोहळ्यात देशाच्या जीडीपी मध्ये मौल्यवान भर टाकणाऱ्या काही निवडक उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये संजय घोडावत ग्रुप, एमआयटी ग्रुप, डी वाय पाटील ग्रुप, मालपाणी ग्रुप अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांसह शेती क्षेत्रात मोलाची कामगिरी करत देशभरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकून देशाच्या जीडीपीस हातभार लावणाऱ्या बार्शीतील मधूबन फार्म आणि नर्सरीचे संस्थापक डॉ. नवनाथ कसपटे यांचा सन्मान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. नवनाथ कसपटे यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र श्री. प्रवीण कसपटे व ऍड. विक्रम सावळे यांनी सदर पुरस्कार स्वीकारला.

डॉ. कसपटे यांनी मागील काही वर्षात बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे सीताफळाच्या विविध जातींचा अभ्यास करून स्वतःचे वेगळे कलम तयार करून जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाची निर्मिती केली आहे. कसपटे यांच्या मधुबन नर्सरीमध्ये जागतिक पातळीवरील ३२ प्रकारच्या सीताफळ वाणांची उपलब्धता करण्यात आली असून त्यापैकी २१ प्रकारच्या वाणांवर विविध प्रयोग सुरू आहेत. कसपटे यांनी स्वतःच्या नावाने विकसीत केलेल्या एनएमके – १ (गोल्डन) या सीताफळ वाणाला चांगली चव, टिकवण क्षमता, कमी बिया, देखणेपणा, आकार आणि बाजारातील मिळणारी किंमत चांगली असल्याने या वाणालाही चांगली मागणी आहे. हे वाण अमेरिका, टांझानिया (दक्षिण आफ्रिका) यासह भारतात १३ राज्यांमध्ये पोहोचले असून त्या-त्या भागातील कृषी उत्पादकांनी या वाणाचा लाभ घेत वाढीव उत्पन्न मिळविले आहेत.

डॉ. कसपटे यांना प्राप्त झालेल्या या पुरस्कारामुळे बार्शीच्या नावलौकिकात भर पडली आहे. या पुरस्कारासाठी डॉ. कसपटे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.