Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > वर्षांला अडीच लाख पर्यंत उत्पन्न मिळवून देणारे जिरेनियम पीक आहे तरी काय?

वर्षांला अडीच लाख पर्यंत उत्पन्न मिळवून देणारे जिरेनियम पीक आहे तरी काय?

अत्तरे, सौंदर्य प्रसाधने यांच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या जिरेनियम तेलाला मोठी मागणी आहे.
मित्राला शेअर करा

दुष्काळी भाग व पावसाची अनियमितता म्हणून मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची ओळख. ही ओळख पुसून टाकण्यासाठी व यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बांधव विविध प्रयोग करताना दिसत आहेत. असाच जिरेनियम शेतीचा यशस्वी प्रयोग आष्टी तालुक्यातील नागनाथ बाबुराव बळे या शेतकऱ्याने केला आहे. यासाठी कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून शेततलावाचा लाभ घेऊन संरक्षित पाण्याची साठवणूक करुन नवनवीन प्रयोग करताना दिसतात.


आष्टी तालुक्यातील पारगाव (जो) येथे नागनाथ बळे यांची शेती आहे. बहुवार्षिक 100 टक्के उत्पन्न देणारी जिरेनियम या सुगंधी वनस्पतीला बाजारपेठेत नियमित खात्रीशीर मागणी असते. त्यामुळे नागनाथ बळे यांनी त्यांच्या 1.20 हेक्टर क्षेत्रावर 24 ते 25 हजार रोपांची सरी वरंबा पद्धतीने ऑक्टोबर 2020 मध्ये लागवड केली. या लागवडीपासून जवळपास 3 ते चार वर्षे उत्पन्न घेतले जाईल.

या प्रकल्पाची माहिती देताना नागनाथ बळे म्हणाले, हा प्रकल्प उभारण्यासाठी मला लागवड खर्च रुपये दीड लाख, शेड उभारणी खर्च रुपये चार लाख आणि यंत्र सामुग्री खर्च रुपये 11 लाख असा एकूण 16 लाख 50 हजार रुपये खर्च आला. वर्षभरात जिरेनियमची चार वेळा छाटणी केली जाते. या शेतीतून एकरी प्रती 3 महिन्यात 10 टन पाल्याचे उत्पादन मिळते. यातील एक टन पाल्यापासून साधारण 900 ते  1000 ग्रॅमपर्यंत तेलाचे प्रमाण म्हणजे 10:1 असे आहे, असे त्यांनी सांगितले.

नागनाथ बळे यांच्याकडून प्रेरणा घेऊन तालुक्यातील इतर शेतकरीही त्यांच्याकडून आज मार्गदर्शन घेत आहेत. निघालेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी इको ग्रीन कंपनी व तेल प्रक्रिया युनिट स्थापन केले आहे. या कंपनीच्या माध्यमातून प्रति रोप रुपये पाच प्रमाणे जिरेनियम रोपांची विक्री केली जाते. तेल निर्मितीसाठी रुपये तीन हजार प्रति टन पालाप्रमाणे इतर शेतकऱ्यांना तेल निर्मिती करून दिली जाते.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषी अधिकारी नवनाथ कोकाटे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, मंडळ कृषि अधिकारी प्रशांत पोळ, कृषि सहाय्यक श्रीमती उज्ज्वला बोर्ड  व इतर तालुका कृषी अधिकारी यांच्यासह या प्रकल्पाला वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन व पाहणी केली .
संप्रदा दत्तात्रय बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी, बीड