बार्शी – तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन व प्रशासनही तत्पर आहे, असे सांगून रेशन कार्डसह बार्शी तालुक्यातील तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट करून त्यांना मासिक मानधन मिळवून देऊ, असे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी केले.
येथील स्मार्ट अॅकॅडमी भाषण प्रशिक्षण केंद्रात तालुक्यातील तृतीयपंथीयांसाठी सचिन वायकुळे यांच्या पुढाकाराने एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, तृतीयपंथीयांचे मार्गदर्शक वायकुळे उपस्थित होते.
आयुष्यभर रस्त्यावर टाळी देत पैसे मागण्याची वेळ तृतीयपंथीयांवर येऊ नये यासाठी त्यांना रेशन कार्ड तसेच उर्वरीतजणांना मतदान ओळखपत्र देण्यासाठी तहसील प्रशासन तत्पर आहे. याचबरोबर येत्या सोमवारी आवश्यक ती कागपदत्रे घेऊन संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म भरून या सर्वांना मासिक मानधन मिळवून देण्यासाठी प्राधान्याने आपण काम करु, असेही तहसीलदार शेख म्हणाले.
यासाठी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सोमवारी तहसील कार्यालयातही या तृतीयपंथीयांचे शिबिर घेऊ व नगरपालिकेच्या माध्यामतून घरकूल योजनेसाठीही प्रस्ताव तयार करण्यासाठी तहसील कार्यालय पुढाकार घेईल, असा शब्दही त्यांनी दिला. बार्शी नगरपालिकेच्यावतीने तेजस व्हटकर व गौरव कवठाळे यांनीही घरकुलाबाबत मार्गदर्शन केले.
गाड्या अडवून मागणे आता थांबवा: कुकडे
रस्त्यावर सतत टाळी देत पैसे मागणे आता थांबवले पाहिजे. प्रतिष्ठेचे जगणे तृतीयपंथीयांच्याही वाट्याला यावे, अशी आमची भावना आहे. येत्या काळात या वर्तनात सुधारणा करावी, गाड्या अडवून सतत पैसे मागत फिरणे आता थांबविले पाहिजे, असे पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे म्हणाले.
प्रारंभी तृतीयपंथीयांचे मार्गदर्शक सचिन वायकुळे यांनी प्रास्ताविकात या समुदायाच्या मागण्या व प्रश्न यावर प्रकाश टाकला.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!