बार्शीचे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांच्या संशोधनाला मोठे यश
बार्शी- कोविड रुग्णांमध्ये केलेला स्टिरॉइड्स चा अतिवापर कमी झालेली प्रतिकारशक्ती व वाढलेली शुगर यामुळे पोस्ट कोविड रुग्णांना होणाऱ्या अत्यंत भयावह व महागड्या सिद्ध झालेल्या म्युकरमायकोसिस या रोगावर प्रभावी असे औषध निर्मिती क्षमता असणाऱ्या जंतूंचा नुकताच शोध लावल्याचे बार्शीचे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांनी सांगितले

म्युकरमायकोसिस हा पोस्ट कोविड रुग्णांमध्ये होणारा बुरशीजन्य रोग असून त्यामुळे रुग्णाचे डोळे,मेंदू व फुफ्फुसावर परिणाम होत असल्याने व अत्यंत महागड्या उपचार पद्धती मुळे जीवघेणा ठरलेला आहे. अँम्फोटेरेसिन बी हे एकमेव इंजेक्शन उपयुक्त ठरले असले तरी अत्यंत महाग असल्याने रुग्ण मेटाकुटीला आलेले होते.त्यामुळे संशोधक योग्य पर्याय शोधत होते.आठ महिन्यांच्या अथक संशोधनातून शोधलेल्या जंतूंमुळे पर्यायी औषध निर्मिती होण्याची शक्यता वाढली असल्याचे डॉ सुहास कुलकर्णी यांनी सांगितले.
ॲक्टिनोमायसीट्स या वर्गातील जंतू हे औषध निर्मिती क्षमता असणारे असल्याने,त्या प्रजातींच्या जंतूंचा शोध गेले आठ महिने संशोधक घेत होते. अखेर ‘वेस्टर्न घाट परिसर’ जो बायोडायव्हर्सिटी साठी हॉट स्पॉट मानला जातो त्या परिसरातून या जंतूंचा शोध घेण्यात संशोधकांना यश आल्याचे शेटे मांडे यांनी सांगितले. एकूण ६७ प्रकारचे जंतू मिळवून त्यांची म्युकरमायकोसिस च्या बुरशीवर चाचणी घेतली असता १५ जंतूंमध्ये औषध निर्मिती क्षमता असल्याचे आढळले. या १५ पैकी फक्त दोनच जंतूंमध्ये प्रभावी औषध निर्मिती क्षमता अधिक असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे जिनोम सिक्वेन्सीग करण्यात आले व हे जंतू स्ट्रेप्टोमायसिस ग्रीसीअस व स्ट्रेप्टोमायसिस अलबोग्रीसीओलस या नावाचे असल्याचे ओळखण्यात संशोधकांना यश आले आहे.
कोणत्याही रोगावर प्रभावी औषध निर्मितीसाठी ती क्षमता असणाऱ्या जंतूंचा शोध हा पहिला व मोठा टप्पा मानला जातो.जंतूंच्या या शोधामुळे हा टप्पा पार केला असून पुढील चाचण्या जर यशस्वीपणे पार पडल्या तर म्युकरमायकोसिस वर प्रभावी औषध निर्मिती चा पर्याय उपलब्द्ध होण्याची व त्यामुळे म्युकरमायकोसिस (Mucormycosis) च्या रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वाढल्याचे डॉ सुहास कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले
कोण आहेत संशोधक:
डॉ सुहास कुलकर्णी हे निवृत्त प्रोफेसर असून सूक्ष्मजीवशास्रज्ञ आहेत. दोन संशोधकांची एम फील,सात जणांची पीएचडी, १४ पुस्तकातील लिखाण, ५० पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स व १९ शोध त्यांच्या नावावर जमा आहेत .म्युकर मायकोसिस (Mucormycosis) वरील या आधी त्यांनी केलेल्या संशोधनाचा रुग्णांना चांगलाच उपयोग झालेला आहे .
सौ अमृता शेटे मांडे या सूक्ष्मजीव शास्त्राच्या अभ्यासिका असून पीएचडी करत आहेत तसेच त्या नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हाॅस्पिटल (NDMCH), बार्शी, सोलापूर.या ठिकाणी कार्यरत आहेत
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ