Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > शिक्षकांच्या नियमित वेतनासाठी आता ‘वन हेड वन व्हाऊचर’ योजना

शिक्षकांच्या नियमित वेतनासाठी आता ‘वन हेड वन व्हाऊचर’ योजना

शिक्षकांच्या नियमित वेतनासाठी आता 'वन हेड वन व्हाऊचर' योजना
मित्राला शेअर करा

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार आता महिन्याच्या एक तारखेलाच जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘वन हेड वन व्हाऊचर’ योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.

पाटील यांनी शिक्षणाधिकार्‍यांना दिलेल्या निर्देशानुसार, शालार्थ वेतन प्रणालीमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खासगी माध्यमिक शाळेसाठी वेतन पथकाकडे वितरित केलेल्या वेतन अनुदानातून नियमित वेतन अनुदानाशिवाय वेतनविषयक अन्य देयकांच्या रकमा शालार्थ प्रणालीमधील अ‍ॅक्टिव टॅबमधून विविध जिल्ह्यांतील संबंधित अनुदान पात्र शाळेच्या मुख्याध्यापकाकडून व संबंधित जिल्ह्याच्या वेतनपथक (माध्यमिक) अधीक्षकांकडून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या नियमित वेतनाच्या प्रक्रियेस अडथळा निर्माण होऊन आर्थिक शिस्त बिघडण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे अशा प्रकारची आर्थिक शिस्त न बिघडता सर्व जिल्ह्यांतील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या मान्य पदांच्या मर्यादेत वेतन अनुदानाचा वर्षभर नियमित वेतन उपलब्धता होण्याचे दृष्टीने व पर्यायाने उपलब्ध अनुदानाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांतील अनुदानित शाळेचे नियमित वेतन एक तारखेस संबंधित कर्मचार्‍याच्या खात्यात जमा होण्यासाठी सन 2023-24 चा मार्च 2023 पासूनचा फेब्रुवारी 2024 पर्यंतचा पगार 01 तारखेस होण्याच्या दृष्टीने शालार्थ प्रणालीमधील नियमित वेतनाव्यतिरिक्त अन्य देयके खर्च न होण्याच्या दृष्टीने शालार्थ प्रणालीमधील अनावश्यक टॅब इनअ‍ॅक्टीव करण्याबाबत शालार्थ प्रणालीच्या तांत्रिक कक्षास सूचना दिलेल्या आहेत.

या सूचनांमुळे जिल्हास्तरावर केवळ नियमित वेतन देयक सर्व संबंधित 100 टक्के शाळांच्या मुख्याध्यापकांकडून दरमहा 07 तारखेच्या आत अपलोड झाल्यास त्या देयकांचे अधीक्षक, वेतन पथकस्तरावर योग्य पध्दतीने एकत्रिकरण होऊन जिल्हा कोषागारात दरमहा 20 तारखेपूर्वी एकत्रित वेतनदेयक सादर झाल्यास 01 तारखेस वेतन संबंधित कर्मचार्‍याच्या खात्यात जमा करणे शक्य होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.