Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात मंत्री अमित देशमुख यांची बैठक; खा. ओमराजे यांची माहिती

उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात मंत्री अमित देशमुख यांची बैठक; खा. ओमराजे यांची माहिती

उस्मानाबाद ( धाराशिव ) येथिल नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री मा.ना.अमित भैय्या देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदयांच्या मुंबई येथिल मंत्रालय दालनात बैठक संपन्न झाली.
मित्राला शेअर करा

उस्मानाबाद ( धाराशिव ) येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या ४३० खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास १३ जानेवारी २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाविद्यालयीन पदे भरण्यासही मान्यता देण्यात आली होती. मधल्या काळात मा.मंत्रीमहोदय जिल्हा दौऱ्यावर आले असता जागेची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती.

आजच्या आढावा बैठकीत मा.मंत्रीमहोदयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे ( एनएमसी ) वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत सादर करण्याबाबत निर्देश दिले . उस्मानाबाद येथे केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांप्रमाणे 100 प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे संलग्नीत रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे . यासाठी अंदाजे 25 एकर जागा लागणार आहे.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांनी महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावावर होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना बैठकीदरम्यान केल्या आहेत हे महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणे गरजेचे आहे असे नमूद करून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी जागा निश्चित केल्यानंतर आवश्यक असणारी जमीन ताब्यात घेणे, वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या नावावर करुन घेणे या प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे असे मंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

याबैठकीस आ. कैलास घाडगे – पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप मैसेकर, उपसचिव संजय सुरवसे , जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित होते .