Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > उस्मानाबाद नगर परिषद प्रभाग रचना सादर, बुधवारी होणार मतदार यादी प्रसिद्ध

उस्मानाबाद नगर परिषद प्रभाग रचना सादर, बुधवारी होणार मतदार यादी प्रसिद्ध

मित्राला शेअर करा

निवडणुकीत 20 प्रभाग व 41 सदस्य असणार नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे.

उस्मानाबाद नगरपरिषद निवडणुकीत २० प्रभाग तर ४१ सदस्य असणार असून बुधवारी ५ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी दिली. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे . शहरातील प्रभाग १ ते १९ या प्रभागात प्रत्येकी दोन तर २० नंबर प्रभागात ३ सदस्य असणार आहेत.

नोव्हेंबर २०१६ च्या निवडणुकीत मतदार संख्या ८५ हजार होती ती आता जवळपास १ लाख ५ हजार झाल्याने प्रभाग संख्या ही १९ वरून २० तर सदस्य संख्या ३९ वरून ४१ होणार आहे . ३९ सदस्य असलेल्या नगर परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक १७ , शिवसेना ११ , भाजप ८ तर काँग्रेसचे २ व एक सदस्य अपक्ष निवडून आले होते तर शिवसेनेचे मकरंद राजे निंबाळकर हे नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आले होते व त्यांच्या रूपाने शिवसेनेची पालिकेवर सत्ता राहिली आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हांवर निवडून आलेल्या १७ सदस्य पैकी आमदार राणा दादा समर्थक व राष्ट्रवादीत राहिलेले सदस्य असे दोन गट आहेत.

उस्मानाबाद नगर परिषद सदस्य व नगराध्यक्ष यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शुक्रवारी ३१ डिसेंबर पासून नगर परिषदेवर प्रशासक यांची नेमणूक करण्यात आली आहे . कोरोना अनुषंगाने निवडणुका या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत. नगर परिषद प्रशासनने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे तर इच्छुकांची भाऊगर्दी मोठी आहे त्यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे . सध्याच्या स्तिथीवरून नगर परिषद निवडणुकीत भाजप व शिवसेना यांच्या दरम्यान थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे .