PMEGP या योजनेच्या माध्यमातून व्यवसायाची महत्त्वकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जात आहे.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या योजनेतून जिल्हा उद्योग केंद्रा अंतर्गत आता ‘फूड ऑन व्हील्स’ संकल्पनेला चालना देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांना ५०,००० ते २० लाख रुपयांचे कर्ज निकषांनुसार मंजूर करण्यात येईल. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना ही स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी आहे असे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
या संकल्पने अंतर्गत एखाद्या छोट्या गाडीमध्ये फास्ट फूड सेवा पुरविली जाते. छोटा हत्ती, छोटा ट्रक अशा प्रकारच्या वाहनात एक संपूर्ण स्वयंपाकघर असते. त्याला ‘मोबाईल रेस्टॉरंट‘, फूड ट्रक, असेही म्हणतात. यामार्फत फास्ट फूड, सँडविच, बर्गर, फ्रेंच फ्राईज, चायनीज किंवा स्थानिक लोकांच्या आवडीप्रमाणे इतर खाद्यपदार्थ देखील विक्री करता येऊ शकतात. सदर व्यवसाय हा पूर्णपणे चालता-फिरता असल्यामुळे आठवडी बाजार, एखादा कार्यक्रम अशा कोणत्याही ठिकाणी सदर व्यवसायिकाला आपली गाडी नेऊन त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात देखील व्यवसाय करता येऊ शकतो.
युरोपीय व इतर पाश्चात्य देशांमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आपल्याकडे हा व्यवसाय फारसा प्रचलित नाही. आगामी काळात या व्यवसायाला मोठी मागणी निर्माण होणार आहे. त्यामुळे ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी ‘आत्मनिर्भरते’ची ही एक सर्वोत्तम संधी ठरणार आहे.
इच्छुकांना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अंतर्गत सदर व्यवसायासाठी आवश्यक असलेले वाहन तसेच पुढील इतर गोष्टींसाठी देखील कर्ज मंजूर करून देण्यात येईल. आता गरज आहे फक्त आपल्या इच्छाशक्तीची आणि अंगी असलेल्या कौशल्याच्या योग्य वापराची.
आपल्याला आवश्यक ती सर्व मदत करण्यास आम्ही तयार आहोत. तेव्हा अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन ‘आत्मनिर्भर‘ होण्याकडे वाटचाल सुरू करावी असे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद