बार्शी/महाबळेश्वर – ग्रामीण भागातील टॅलेंटला डिजिटल मीडियानेच जगासमोर आणलं. अनेकदा मोबाईल पत्रकारांना हेटाळलं जातं, मात्र त्या मोबाईलमुळेच आज मीडियात क्रांती झाली आहे, असे मत प्रा. विशाल गरड यांनी व्यक्त केले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं पहिलं अधिवेशन महाबळेश्वर येथील पुस्तक पुस्तकाचं गाव असलेल्या भिलार येथे पार पडलं, त्यावेळी आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री दीपक केसरकर यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत भिलार येथे पहिलं अधिवेशन पार पडलं. संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले, तसेच सातारा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाचं यावेळी कौतुक केलं.
याप्रसंगी पुढे बोलताना गरड म्हणाले, देशातील, राज्यातील मोठमोठे मीडिया चॅनेल्स ग्रामीण भागातील बातमीदारी, टॅलेंट दाखवताना मर्यादित वार्तांकन करतात. मात्र, डिजिटल मीडियामुळे या सीमारेषा संपुष्टात आल्या आहेत. मोबाईल घेऊन ही मंडळी युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यत ग्रामीण भागातील टॅलेंट पोहोचवतात. डिजिटल मीडियात क्रीएटीव्हीटीला वाव आहे, कॉपी पेस्ट पत्रकारिता जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे, डिजिटल पत्रकारांनी क्रिएटिव्ह वृत्तांकन करावं असं गरड यांनी म्हटलं. तसेच, ग्रामीण भागातील या डिजिटल पत्रकारांसाठी टेक्निकल माध्यमातून पैसा कसा कमवावा, या मीडियाचा आर्थिक गणित तांत्रिकदृष्ट्या समजावून येण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
परिसंवादात ॲड.अतुल पाटील यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू समजावून सांगितली. शिवाजी विद्यापीठाचे पत्रकारिता विभागाच्या विभागप्रमुखांनी पत्रकारितेची बदलती कूस महत्वाची असून, डिजिटल पत्रकारांनी विश्वासार्हतेला प्राधान्य देण्याचे सांगितले. यावेळी, इतरही मान्यवरांची भाषणे झाली.
सौजन्य बार्शी टाइम्स
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक