Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > वंचितांसाठीच्या योगदानाबद्दल सचिन वायकुळे यांचा बार्शी नगरपालिकेकडून सन्मान

वंचितांसाठीच्या योगदानाबद्दल सचिन वायकुळे यांचा बार्शी नगरपालिकेकडून सन्मान

वंचितांसाठीच्या योगदानाबद्दल सचिन वायकुळे यांचा बार्शी नगरपालिकेकडून सन्मान
मित्राला शेअर करा

बार्शी:- वंचित घटक असलेले तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क मिळवून देणे, तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांचे आरोग्य तसेच शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळवून देणे यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल लेखक सचिन वायकुळे यांचा बार्शी नगरपालिकेच्यावतीने सन्मान करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी पालकमंत्री विजकुमार देशमुख, आमदार बबन अवताडे तसेच आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते वायकुळे यांचा हा सन्मान करण्यात आला. वंचितांना लोकशाहीचा अधिकार मिळावा यासाठी तृतीयपंथी व देहविक्रय करणाऱ्या महिलांचा मतदान ओळखपत्र मिळवून देण्यासाठी वायकुळे यांनी पुढाकार घेतला.

याचा परिणाम म्हणून बार्शी तालुक्यातील ३९ तृतीयपंथीयांचा मतदान यादीत समावेश झाला. सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला.

राज्य निवडणुक आयोग तसेच तहसील कार्यालय यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली होती. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिक्षणप्रवाहात आणणे तसेच या दोन्ही वंचितांना आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच मतदान ओळखपत्र देणे यासाठी वायकुळे यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत बार्शी नगरपालिकेने त्यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी वायकुळे यांच्यासह त्यांचे वडिल निवृत्त तससीलदार मदनराव वायकुळे, क्रीडा शिक्षक समीर वायकुळे यांनी हा सन्मान स्विकारला.

यावेळी बार्शी नगरपालिका प्रशासक बाळासाहेब चव्हाण, तहसीलदार एफ.आर. शेख, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.