सध्याच्या काळात जगभरात कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून कृषी पर्यटनातूनच पर्यावरण सुलभ आणि शाश्वत पर्यटन साध्य केले जात आहे. वाढते नागरिकीकरण, कोरोनासारख्या आजारातून वाढत जाणारा मानसिक ताणतणाव या पार्श्वभूमीवर कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला येत्या काळात मोठी संधी असणार आहे.
स्वच्छ मोकळे वातावरण, ग्रामीण- जीवन अनुभव, विविध परंपरा, सण-उत्सव, खाद्यपदार्थ याबरोबरच ‘हुरडा पार्टी’ यासारख्या नवीन एकदिवसीय पर्यटन आणि ग्रामीण अनुभव देणारी संकल्पना मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात लोकप्रीय होताना दिसते. मराठवाड्यात उद्योग व पर्यटना बरोबरच कृषी पर्यटन हा व्यवसाय नव्याने उभारी घेत आहे. वेगळेपण असलेल्या मराठवाडा विभागात जागतिक वारसा स्थळे व पर्यटन केंद्र, लेण्या, किल्ले, वास्तू आहेत
कृषी पर्यटन ही एक उभारी देणारी संकल्पना असून, कृषी पर्यटनामुळे अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होत आहे. शेती आणि पर्यटनाच्या संगमातून केवळ रोजगार संधीच निर्माण होत नाहीत तर ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला चालना मिळते कृषी पर्यटनाला चालना देताना या क्षेत्रातील घटकांचे, विशेषत: महिलाच्या कौशल्य विकास, प्रशिक्षण करण्यावर भर देण्याचे शासनाचे धोरण आहे. येत्या काळात कृषी पर्यटनाला चालना देण्याचा निर्धार 2021 च्या चौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आला असुन तो कृषी पर्यटनाला नक्कीच उभारी देणारा ठरणार आहे.
पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीसह देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भर टाकण्याची क्षमता असल्याने त्या अनुषंगाने राज्यात पर्यटनाच्या विविध क्षेत्रांना चालना देण्यात येत आहे. कृषी पर्यटन धोरण जाहीर केल्यानंतर राज्यात काही कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत. यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच इतर शेतकऱ्यांना रोजगाराची प्रेरणा मिळाली. मराठवाडा विभागात आठ जिल्ह्यात एकूण 28 कृषी पर्यटन केंद्र आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 14 कृषी पर्यटन केंद्र असून यातील आठ पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. प्रामुख्याने सृष्टी कृषी पर्यटन केंद्र मिर्झापूर नगर रोड औरंगाबाद, चैतन्य कृषी पर्यटन केंद्र, वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र वडगाव जाधव, याचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. कृषी पर्यटनाच्या विकासासाठी यापुढील काळातही व्यापक उपाययोजना राबविण्यात येत असून शेतीचा जोडव्यवसाय म्हणून कृषी पर्यटन विकसीत होत आहे.
राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पर्यटनविकासासाठी प्रायोगिक तत्वावर ‘जिल्हा पर्यटन अधिकारी’ नेमण्याबाबत कार्यवाही कऱण्यात येत आहे, तसेच पर्यटनविकासासाठी खासगी संस्थांच्या सहभागासाठी जिल्ह्यात पर्यटन सोसायटी स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्यात कृषी विभागाच्या ३० टक्के योजना या महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याने कृषी पर्यटन धोरण जाहीर करुन राज्याने या क्षेत्रात आघाडी घेतली. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, त्यामुळे कृषी पर्यटनाला देशात व राज्यात मोठा संधी आहे. इटली, स्पेनसह विविध युरोपीयन देश, अमेरीका आदी ठिकाणी कृषी पर्यटनात विविध प्रयोग केले जात आहेत. गावाचे गावपण, संस्कृती, विचार परंपरा, उत्सव, खाद्यपदार्थ हे ग्रामीण पर्यटनाचे घटक बनले असून निस्वार्थी शेतकरी स्थयीभाव, आदर आतिथ्याची जोड, शिक्षण व तंत्रज्ञानाची साथ, यामुळे महिलाचा सहभाग ग्रामीण पर्यटनाला मोठा वाव आहे. कोरोनोत्तर काळात या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात अली आहे. यामुळे कृषी पर्यटन हे पर्यटन विकासात शाश्वत योगदान देणारे पर्यटन म्हणून पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे.
मीरा ज्ञानदेव ढास
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन