Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > सीना भोगावती जोड कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जारी – आमदार राजेंद्र राऊत

सीना भोगावती जोड कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जारी – आमदार राजेंद्र राऊत

सीना भोगावती जोड कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जारी - आमदार राजेंद्र राऊत
मित्राला शेअर करा

बार्शी तालुक्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्याकरीता सतत प्रयत्नशील असणारे आमदार राजेंद्र राऊत यांनी मागील महिन्यात बार्शी तालुक्यातील १५ गावांसह चार तालुक्यातील सिंचनासाठी महत्त्वकांक्षी असलेला सीना भोगावती जोड कालव्याच्या प्रकल्पाचा नवीन सर्वे करण्यासाठी संबंधित अधिकारी व शेतकरी बांधवांसोबत इर्ले या गावी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी अधिकारी व शेतकऱ्यांची मते जाणून घेतली.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या सीना भोगावती जोड कालव्याबाबत आपण मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक लावणार असल्याची माहिती या बैठकीत त्यांनी दिली होती.

त्यानंतर मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दालनात आमदार राजेंद्र राऊत, जलसंपदा विभागाचे सचिव वी. वी. राजपूत व जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. टी. धुमाळ यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत सदर योजने बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना व इतर चार तालुक्यांना या योजनेचा कसा लाभ होईल याबाबत माहिती देण्यात आली होती.

यानंतर मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडून, या योजनेच्या फेर सर्वेक्षण संदर्भात आदेश काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार या योजनेचा सर्वे करण्यास महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाच्या उपसचिव जया पोतदार यांनी कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांना पत्राद्वारे कळविले असून लवकरच सीना भोगावती जोड कालवा होण्याबाबत, सीना नदीवरून भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे पुनर्भरण प्रकल्पाचे लाभ क्षेत्र सर्वेक्षणा बाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.

या प्रकल्पाकरिता दोन प्रकारे सर्वेक्षण करण्यात येणार असून माढा तालुक्यातील रिधोरे किंवा तांदुळवाडी वरून रस्तापूरच्या माळावर पाणी आणत भोगावती नदीमध्ये कसे सोडता येईल याबाबतचा प्रथम सर्वे करण्यात येणार आहे. हे जर शक्य झाले तर तालुक्यातील रस्तापुर, सुर्डी, मालवंडी, गुळपोळी, पानगाव, उंडेगाव, कव्हे, कोरफळे यांसह अन्य गावातील कोरडवाहू जमीन ओलिताखाली येणार आहे. तर तावडीच्या तळ्यातून बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी खामगावच्या नदीमध्ये घेऊन ढाळे पिंपळगावच्या धरणामध्ये आणत या धरणातून ओव्हरप्लो झालेले पाणी भोगावती नदीमध्ये सोडता येईल का असाही दुसरा सर्वे करण्यात येणार आहे.

या महत्त्वकांक्षी प्रकल्पाबाबत आमदार राजेंद्र राऊत यांनी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली निधीची कमतरता भासणार नाही याची ग्वाही दिली. सीना भोगावती जोड कालवा बार्शी तालुक्यासह मोहोळ, माढा, उत्तर सोलापूर या तालुक्यांचा देखील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवणार आहे. त्यामुळे या चार तालुक्यांसाठी हा महत्त्वाचा जोड प्रकल्प असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.