जर्मनीतील बाडेन – वुटेनबर्ग या राज्यास महाराष्टातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनामार्फत सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे जर्मनीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
यानुसार राज्यातील १०,००० कुशल मनुष्यबळ टप्याटप्याने पुरविले जाणार आहे. आरोग्य विभागातील परिचारिका, वैद्यकीय सहायक, रेडीओलॉजी सहायक, केअर टेकर, कौशल्य विकास विभागातील सेवक, वेटर, स्वागत, कक्ष संचालक, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक तंत्रशिक्षण विभागातील इलेक्ट्रीशिअन, औष्णिक वीज तंत्री, गवंडी कामगार, प्लंबर, वाहनचालक, सुरक्षारक्षक, पॅकर्स व मुवर्स अश्या वेगवेगळ्या ३० क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवायचे आहे.
याकरिता गोथे संस्थेच्या मार्फत ऑनलाइन व ऑफलाईन स्वरुपात जर्मन भाषा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण सेवासदन प्रशाला, ज. रा. चंडक प्रशाला, नूतन प्रशाला विजापूर रोड आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) डफरीन चोक सोलापूर या ठिकाणी प्रशिक्षणार्थींच्या सोयीनुसार सकाळ व संध्याकाळ सत्रात एकूण ५ प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जाणार आहे. तसेच आणखीन ५ वर्ग तालुकास्तरावर वाढविण्याचे नियोजन आहे. प्रत्येक वर्गात २५ प्रशिक्षणार्थी असतील. सदर जर्मन भाषा प्रशिक्षणासाठी शशिकांत शिंदे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूर जि. सोलापूर हे समन्वयाचे काम करणार आहेत.
सदर जर्मन भाषा वर्गाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षानार्थीना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार A1, A2, B1, B2 या स्तराच्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणास प्रति व्यक्ती ३३ हजार रुपये खर्च शासन करणार आहे. त्यानंतर गरज लागली तर संबधित क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून डायटचे प्राचार्य हे मुख्य समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. या संदर्भात दि. ११ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
जर्मन भाषा शिकून जर्मनीत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या कौशल्यप्राप्त व्यक्तींनी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी.
https://www.maa.ac.in/GermanyEmployment/
तसेच जर्मन भाषा शिकविणाऱ्या तज्ञ व्यक्तींचे प्रमाण वाढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शिक्षकांना जर्मन भाषा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. म्हणून जिल्ह्यातील ज्या शिक्षकांना जर्मन भाषा शिकायची आहे त्यानी
https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7
या लिंकवर नाव नोंदणी करावी असे आवाहन डायटचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांनी केले आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!