विद्यापीठाकडून प्रक्रिया सुरू; हेल्पलाइन नंबर जाहीर
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दि. 15 जून 2022 पर्यंत ऑनलाईन माध्यमातून फॉर्म भरता येणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुरेश पवार यांनी दिली.
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पदवीधर मतदारसंघातून दहा जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मधील कलम 131 नुसार प्रथम नोंदणीकृत पदवीधर यादीत 15 2022 पर्यंत पदवीधरांना नाव नोंदणी करता येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पदवीधर व सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले शिवाजी विद्यापीठाचे सन 2004 पूर्वीचे पदवीधर याकरिता अर्ज भरण्यास पात्र राहणार आहेत.
विद्यापीठाच्या www.sus.ac.in
या संकेतस्थळावर ‘विद्यापीठ निवडणूक 2022’ या पोर्टलवर पदवीधरांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरता येणार आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत तसेच निवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी एक द्यावयाचे आहे. वीस रुपये शुल्क पदवीधरांना भरावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची साक्षांकित प्रत तसेच आवश्यक कागदपत्रासह कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे पोस्टाने अथवा प्रत्यक्ष दि. 18 जून 2022 पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. ज्या पदवीधरांनी सन 2010, 2015 आणि 2017 च्या निवडणुकीसाठी नोंदणीकृत पदवीधर यादीत नाव नोंदवलेले आहे, अशा पदवीधरांनी पुनश्च नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अशा पदवीधरांच्या याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र पदवीधर नोंदणी केलेल्या पदवीधरांना पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावयाचे आहे, यासाठी स्वतंत्र जाहिरात व प्रक्रिया विद्यापीठाकडून नंतर सुरू करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पवार यांनी सांगितले.
ऑनलाईन अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी आल्यास विद्यापीठाच्या 7796171774 आणि 7796171768 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करावा. विद्यापीठाच्या निवडणूक विभागातही या संदर्भात अधिक माहिती मिळेल, असे डॉ. पवार यांनी सांगितले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद