Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी 'मित्र' संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
मित्राला शेअर करा

सोलापूर:– सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या उपक्रमांची महत्त्वपूर्ण भर पडणार आहे. उजनी जलाशय पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, महिला बचतगटांचे उत्पादन, पारंपरिक उद्योग आणि स्वयंरोजगार संधी यावर लक्ष केंद्रित करत जिल्ह्याच्या प्रगतीसाठी बहुपर्यायी योजना राबवण्यात येणार आहेत.


महास्ट्राराईड प्रकल्पांतर्गत नुकतीच सोलापूर जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम, महापालिका व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उजनी जलाशय पर्यटन केंद्र
बैठकीत उजनी धरण परिसरात पर्यटन केंद्र विकसित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. पक्षी निरीक्षण, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग, रिसॉर्ट्स आदी सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना आकर्षित करणे आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांनी या संदर्भात सादरीकरण केले.

सोलापूर – मेडिकल हब
सोलापूर शहरात विविध तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे शहराला ‘मेडिकल हब’ म्हणून विकसित करण्याची गरज असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले.

डाळिंब क्लस्टर आणि प्रक्रिया उद्योग
सोलापूर जिल्हा डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर डाळिंब क्लस्टर स्थापन करून प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि निर्यात वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

आयटी पार्क आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
सोलापुरात आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला ‘मित्र’ संस्थेचा पाठिंबा मिळणार आहे.

शेंगाचटणी ब्रँडला चालना
महिला बचतगटांद्वारे उत्पादित ‘रुक्मिणी’ शेंगाचटणी ब्रँडला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘मित्र’ पुढाकार घेणार आहे. पारंपरिक वस्त्रोद्योग आणि विडी उद्योगालाही बळ दिले जाणार आहे.

जोडधंद्यांना प्रोत्साहन
रेशीम उद्योग, शेळीपालन यांसारख्या ग्रामीण जोडधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे विभागाच्या उपलब्ध जमिनींचा वापर केला जाणार आहे. अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीत रस्ते व पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबतही चर्चा झाली.

रोजगारनिर्मिती आणि स्वयंरोजगार
तरुण आणि महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असून, जिल्हा उद्योग केंद्र व विविध महामंडळांच्या योजनांचा लाभ संबंधित घटकांना मिळवून देण्यात येणार आहे.

जागतिक बँक व राज्य सरकारचा सहभाग
महास्ट्राराईड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकार आणि जागतिक बँक यांच्या सहकार्याने ‘मित्र’ संस्थेमार्फत राबवला जात आहे. या उपक्रमांमुळे सोलापूर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढून आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.