‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले…. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…
ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले.
दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांचा अमाप उत्साह यावेळी जाणवत होता. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
श्री संत तुकाराम महाराज पालखी
देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी पादुकांचे पूजन आणि आरती केली. यावेळी आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थानचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते. महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.
श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी
आळंदी येथील समाधी मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पूजेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे आदी उपस्थित होते.
मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
वारकऱ्यांसाठी सुविधा
आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदिर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!