ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास करून ती चांगल्या प्रकारे नागरिकांकरीता दळणवळणासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्रामसडक योजना भाग ३, बॅच १ मधून बार्शी तालुक्यातील ११ किलोमीटर लांबीच्या २ रस्त्यांकरिता १० कोटी १ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
खासकरून तालुक्यातील गेली १५ वर्षांपासून दुर्लक्षित असलेला व वाणेवाडीच्या गावकऱ्यांची सतत मागणी असलेला रस्ता राज्यमार्ग क्र. १४५ ते वानेवाडी-आगळगाव या ४.५ किमी. लांबीच्या रस्त्याकरिता ४ कोटी ११ लाख रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे येथील गावकऱ्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रस्त्याच्या मागणी करता मतदानावर बहिष्कार घातला होता. या बहिष्कारामुळे वाणेवाडी गावाने संपूर्ण प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. अखेर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजेंद्र राऊत यांनी तुमचा रस्ता मी करतो म्हणून शब्द दिला होता.आज तो शब्द आमदार राजेंद्र राऊत यांनी खरा करून दाखविला असून ते वाणेवाडीकरांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत.
बार्शी तालुक्यातील दोन रस्ते पुढीलप्रमाणे १) राज्य मार्ग १४५ ते वानेवाडी-आगळगाव या ४.५ किमी.लांबीच्या रस्त्याकरीता ४ कोटी ११ लाख रुपये, २) महागांव-पिंपळगांव (पान.) ते कळंबवाडी (पान.) या ६.५ किमी.लांबीच्या रस्त्याकरीता ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
येणाऱ्या पुढील काळात म्हणजेच कोरोना महामारी नंतर बार्शी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक गरजा, सोयी-सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध असून त्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.कोरोना महामारीमुळे विकास कामांचा निधी उपलब्ध करण्यात अडचणी येत असून जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव रोखणे व विकास कामे यांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाकरिता एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी, ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर साहेब यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.नितीन गडकरी यांनीही तालुक्यातून जाणारे राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग यांकरिता यापूर्वी जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे व माजी मुख्यमंत्री,विधानसभा विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांचेही आभार व्यक्त केले.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत