कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बार्शी शहर व तालुक्यातील लोकांना आरोग्यसेवा देण्याकरीता बार्शी नगरपरिषदेच्या सध्या बंद असलेल्या जवाहर रुग्णालयाच्या इमारतीत नवीन कोवीड केअर सेंटर उभारून या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार देण्याची सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तत्पूर्वी आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रांताधिकारी हेमंत निकम, नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, तहसीलदार सुनील शेरखाने मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील मॅडम, गटविकास अधिकारी शेखर सावंत, तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ.अशोक ढगे, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. सौ.शितल बोपलकर, डॉ. प्रकाश बुरगुटे, डॉ. कैवल्य गायकवाड यांच्यासोबत जवाहर रुग्णालयाची पाहणी करून एकत्रित बैठक घेतली. बैठकीत लवकरच 50 बेडचे कोवीड केअर सेंटर व त्यापैकी 30 ऑक्सिजन बेडचे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ते म्हणाले की, सध्या कोरोनाच्या प्रकोपाची परिस्थिती पाहता प्रांताधिकारी हेमंत निकम साहेब यांच्या अधिकारात एक वर्षाच्या कालावधीसाठी जवाहर रुग्णालयाचे हस्तांतर खासगी सुविधा हॉस्पिटलचे डॉ.प्रकाश बुरगुटे व डॉ.कैवल्य गायकवाड यांच्याकडे करण्यात येणार आहे.
आमदार राऊत म्हणाले की, सध्या बार्शी तालुक्यात जगदाळे मामा हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, सोमाणी हॉस्पिटल, डॉ अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटल, शहा हॉस्पिटल येथे कोविड केअर सेंटर सुरू आहेत. सध्या बार्शीतील कोवीड सेंटर केंद्रांवर बार्शी तालुका व आजूबाजूच्या पाच सहा तालुक्यातील रुग्णांचा ताण वाढत आहे. यामुळे भविष्यातील गरज पाहता आणखी 200 ऑक्सिजन बेडचे कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नगरपरिषदेच्या जवाहर हॉस्पिटल संदर्भात बोलताना ते म्हणाले की, पूर्वी शासन निर्णयानुसार निवृत्त कर्मचारी व तज्ञांची नियुक्ती करता येत नसल्याने हे हॉस्पिटल बंद आहे. नगरपरिषदेच्या वापरातील प्रियदर्शनी इमारतीची दुरुस्ती करून तेथे तात्पुरती सोय करण्यात येणार आहे. तसेच जुन्या जवाहर हॉस्पिटलची इमारत वापरा योग्य आहे की नाही याची तांत्रिक तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानुसार त्याची दुरुस्ती करून ती इमारत पुन्हा वापरण्यात येईल. या पद्धतीने शहरातील बंद असलेले जवाहर हॉस्पिटल पुन्हा सुरू करण्याकरिता नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार या इमारतीमध्ये सेवाभावी संस्था किंवा खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांकरिता आरोग्य सेवा सुरू केल्यास ही इमारत त्यांना देण्याची तयारी होती. परंतु त्रिसदस्यीय समितीचा दर निश्चिती विषयी निर्णय न झाल्याने तो प्रश्न प्रलंबित आहे. आचार संहिता संपल्यानंतर लवकरच त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत याविषयी निर्णय घेऊन नाममात्र भाडे आणि अनामत रक्कम जमा करून जवाहर हॉस्पिटल मार्फत पुन्हा एकदा नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे धोरण राबविण्यात येईल.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न