आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन,विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची “लालपरी ” धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल परिवहनमंत्री श्री परब यांनी समाधान व्यक्त करत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. १९ जुलै रोजी या बस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थांना, विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचनाही श्री.परब यांनी दिल्या.
या पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरी पर्यंत एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील.
वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसेच प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही श्री.परब यांनी सांगितले.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील
गोरोबा काकांच्या पालखी सोहळ्याचे ” ३ नोव्हेंबरला ” पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान