धाराशिव जिल्ह्याचा विकास करताना आता आपण रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तामलवाडी येथे नवीन औद्योगिक क्षेत्र उभारण्याचा निर्णय उद्योग मंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
या अनुषंगाने एम.आय.डी.सी.चे क्षेत्रिय अधिकारी, लातूर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी तामलवाडी येथे येऊन जागेची पाहणी केली आहे. सोलापूर व परिसरातील अनेक उद्योजक येथे उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत.
कठारे स्पिनिंग मिल्स लिमिटेडच्या मालकीची १४३.४८ हेक्टर जमीन येथे उपलब्ध असून त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी एम.आय.डी.सी.ला जागा देण्याकरिता सहमती दर्शवली आहे. ४०० एकर पेक्षा जास्त जमीन या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रासाठी उपलब्ध होऊ शकते. शेतकऱ्यांना रेडीरेकनर दराच्या ४ पट मावेजासह विकसित क्षेत्रातील १५% जागा नाममात्र दराने दिली जाते.
उद्योग मंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये सोलापूर व इतर ठिकाणचे अनेक उद्योजक येथे येण्यासाठी उत्सुक आहेत, यावर आमदार पाटील यांची सविस्तर चर्चा झाली. आकांक्षित जिल्हा असल्यामुळे येथे उद्योजकांना प्रोत्साहनपर गुंतवणुकीच्या १००% कर सवलत व बऱ्याच इतरही सुविधा मिळतात.
राष्ट्रीय महामार्गासह येणाऱ्या काळात होणाऱ्या रेल्वे मार्गामुळे तामलवाडी येथे उद्योग व्यवसायांना मोठा वाव आहे. किमान १०,००० रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन पुढील आखणी केली जाणार आहे असे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले
More Stories
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील