चणे, फुटाणे व खारेमुरे विक्री करून विश्वेश्वर महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी होत कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुनिता सुदाम अजबकर झटत आहेत. बचत गटामुळे आज त्यांना आत्मविश्वास मिळाला असून यामुळे त्यांचे व्यावहारिक ज्ञान व क्षमताही वाढली आहे. त्यांच्यातील नेतृत्व गुणातील विकासामुळे आज त्या महिला बचतगटाच्या वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा बनल्या आहेत.
सुनिता अजबकर गेवराईतील माळी गल्ली येथे राहतात. त्यांचे माहेर परभणी. त्यांचे वडील फुटाणे, शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय करत असत. पुढे विवाहानंतर गेवराई येथे सासरचाही व्यवसाय फुटाणे व शेंगदाणे निर्मिती व विक्री हाच होता. त्यामुळे त्यांना या व्यवसायाचे ज्ञान पूर्वीपासून होते.
सुनीता ताईंचा हा व्यवसाय सुरु होता. परंतु, भांडवल कमी असल्यामुळे भांडवल वाढ कुठून करावी, या विचारात त्या होत्या. अशातच त्या एके दिवशी बचत गटबाबत माहिती घेण्यासाठी नगर परिषद येथे गेल्या असता, त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या क्षेत्रीय समन्वयक सोमनाथ बुलबुले यांनी महिला बचतगट बाबत सविस्तर माहिती दिली. त्यातून बचतगट स्थापन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांनी शहरातील १० महिला जमा करत चार वर्षांपूर्वी २०१८ साली विश्वेश्वर महिला बचत गट सुरु केला.
बचत गट सुरु झाल्यानंतर बचत, अंतर्गत व बँक कर्ज, विविध शासकीय योजना, विविध प्रशिक्षण याबाबतची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी एस. बी. चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई सी.एम.आर.सी.च्या उषा राठोड व सोमनाथ बुलबुले, आशा माने यांच्याकडून नियमितपणे मिळू लागली.
याबाबत सुनिता अजबकर म्हणाल्या, आमच्या बचतगटाला पात्रतेनुसार माविमने ३ वेळा बँक कर्ज दिले. त्या कर्जातून रक्कम रुपये सहा लाख 25 हजार 900 रुपये बचतगटाला प्राप्त झाले. यामधून मी माझ्या व्यवसायाच्या गरजेनुसार पावणेचार लाख रुपये कर्ज घेऊन माझ्या व्यवसायासाठी खारेमुरे व साखरेचे हार तयार करण्याचे यंत्र खरेदी केले. यातून माझ्या व्यवसायामध्ये वाढ झाली. आता आम्ही होलसेल माल पण विक्री करू लागलो आहोत. दररोज 8 ते 10 क्विंटल मालाचे उत्पादन होते. त्यातील 5 ते 6 क्विंटल मालाची विक्री होते. यामुळे या व्यवसायातून मला व माझ्या कुटुंबाला दररोजचा खर्च वजा जाता दीड ते 2 हजार रुपये नफा मिळत आहे. मी आमच्या बचतगटातील इतर महिलांना पण रोजगार उपलब्ध करून दिला आहे, असे त्या अभिमानाने सांगतात.
कधी घराच्या बाहेर न पडलेल्या सुनिता अजबकर या महिला आर्थिक विकास महामंडळ व कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे आज तालुका, जिल्हा व जिल्ह्याबाहेरच्या कृषि व इतर प्रदर्शनात हिरीरीने स्टॉल लावत आहेत. प्रदर्शनात साधारण ३० ते ४० हजार रुपयांच्या चणे, फुटाणे व खारेमुरे विक्री होत असल्याचे त्या समाधानाने सांगतात. एकूणच विश्वेश्वर बचत गटाच्या माध्यमातून सुनिता अजबकर यांच्या जीवनाला निश्चित दिशा मिळाली आहे.
संप्रदा दत्तात्रय बीडकर
जिल्हा माहिती अधिकारी
बीड
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर