तेर प्रतिनिधी :- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून “उस्मानाबाद जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख आणि पर्यटन” या विषयावरील वेब पोर्टलचे तसेच जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या “उस्मानाबाद : ऐतिहासिक प्राचीन पर्यटन स्थळं” या पुस्तिकेचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे
या जिल्ह्यात काही प्राचीन व ऐतिहासिक महत्व असलेली स्थळे आहेत. त्यात प्रामुख्याने धाराशिव लेणी, रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध असलेले तेर ज्या ठिकाणी परदेशी पर्यटक सुद्धा भेट देतात. माणकेश्वर येथील बाराव्या शतकातील हेमाडपंती मंदिर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरचा तुळजाभवानी, कुंथलगिरी हे जैनांचे पवित्र सिध्द क्षेत्र. मध्ययुगात महत्वाची भूमिका बजावणारे नळदुर्ग व परंडा खर्डा येथील किल्ले अशी अनेक पर्यटन क्षेत्र आहेत त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्याची सांस्कृतिक उपराजधानी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
ग्रीक, रोमन साम्राज्याशी व्यापार असणारे सातवाहन काळातील महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून तेरची ओळख आहे तसेच तेर परिसरात सातवाहन कालीन पुरातत्व अवशेष आजही उत्खननात सापडतात. तेर येथे असणाऱ्या वस्तुसंग्रहालयात हे अवशेष जतन करून ठेवले आहेत. या वस्तुसंग्रहालयाचे नूतनीकरणाचे कामासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी प्राप्त झाला असून नूतनीकरण काम चालू आहे.
तसेच हिंदू, मुस्लिम, जैन आणि बौध्द अशा सर्वच धर्माची प्राचीन स्थळे, किल्ले, लेणी, तलाव अशा विविध पर्यटन स्थळांचा समृध्द असा वाटा या जिल्ह्यास लाभला आहे. याची माहिती मॅपिंग आणि काही आकर्षक छायाचित्रे यांनी हे वेब पोर्टल सजवले आहे, अशी माहिती उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ऐतिहासिक प्राचीन पर्यटन स्थळांची माहिती आणि फोटो असलेली एक पुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाने प्रकाशित केली आहे. पूर्ण जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती पुस्तिकेमुळे एकत्रित स्वरुपात प्राप्त झाली आहे. यात विविध पर्यटन स्थळांची माहिती आहे.
या वेब पोर्टलचे काम येथील जिल्हा माहिती केंद्राने (एनआयसी) केले आहे.
या वेब पोर्टलचे संकेतस्थळ
https://osmanabad.gov.in/mr/tourist/
असे आहे. या केंद्राचे डीआयओ श्री. रुकमे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आहे. उद्घाटन प्रसंगी पोलिस अधीक्षक नीवा जैन, जि.प.चे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, श्री. रुकमे आदी उपस्थित होते.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न