आमदार राजेंद्र राऊत यांनी सन २०२२ – २३ या शेतीच्या खरीप हंगाम पूर्वची आढावा बैठक, बार्शी तालुक्याच्या कृषी विभागाचे सर्व अधिकारी व खत विक्रेते यांच्या सोबत बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतली.
या बैठकीत तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र, त्याचप्रमाणे खरीप हंगामाच्या लागवडीलायकचे एकूण क्षेत्र, खरीप सरासरी क्षेत्र, भाजीपाला, फळबागा लागवडीचे क्षेत्र, एकूण खातेदार व खरीप गावांची संख्या, सन २०२१-२२ यामध्ये झालेला सरासरी पाऊस या सर्व गोष्टींची माहिती घेऊन, सध्यस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
कृषी विभागाने खरीप हंगामासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती बि-बियाणे, खते व कीटकनाशके यांची उपलब्धता करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय होता कामा नये अशा सूचना आमदार राजेंद्र राऊत यांनी दिल्या.
या बैठकीत सोयाबीन, तुर,उडीद, मुग, मका व कांद्याची लागवड याबाबतही प्रमुख्याने चर्चा करण्यात आली. सध्या तालुक्यामध्ये सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३१,७४९ हेक्टर असून प्रत्यक्षात या वर्षी ५५,००० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. त्याचबरोबर मका, उडीद, मुग व कांदा या खरीप पिकांचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता असलेबाबत चर्चा झाली.
बार्शी तालुक्यात २०२१ – २२ या वर्षात राजमा या नवीन पिकाची लागवड १३५ हेक्टर क्षेत्रावर झाली होती. या वर्षी सदरचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी घरच्या घरी सोयाबीन बीयाणांची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया मोहीम, BBF ( रूंद सरी वाफा पध्दत ) द्वारे सोयाबीन पिकाची पेरणी करणे या संदर्भात कृषी विभागामार्फत गावपातळीवर जनजागृती बैठकांचे नियोजन ५ एप्रिल पासून सुरू करण्यात आलेले आहे.
सोयाबीन उत्पादन पाहता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत माल तारण योजना राबविण्यात येणार आहे.
मागील वर्षी कृषी विभागामार्फत महा डीबीटी या योजनेमध्ये वेगवेगळ्या योजनेअंतर्गत तालुक्यातील ८९८९ लाभार्थ्यांना १२ कोटी ३९ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेमध्ये बार्शी तालुका हा महाराष्ट्र राज्यात एक नंबर ठरला असून, याबद्दल आमदार राजाभाऊ राऊत यांनी कृषी अधिकारी शहाजी कदम व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्पादन वाढीसाठी पीक वान बदल, जास्त उत्पादन देणारे वाण, खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन यांबाबतही चर्चा केली.
बार्शी तालुक्यातील वाढणाऱ्या फळबागा यामध्ये प्रामुख्याने सीताफळ, आंबा, द्राक्ष, भाजीपाला प्रतवारी करणे, प्रक्रिया उद्योग, तयार शेतमाल साठवणीसाठी गोदामांची शीतसाखळी, कोल्ड स्टोरेज तयार करणे या विषयावर सविस्तर चर्चा करून शेतीसाठी आवश्यक प्रकल्प उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
या बैठकीत तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी बार्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांना आवश्यक तेवढे खते व बि-बियाणे, किटकनाशके उपलब्ध करून दिले जातील, याची निश्चित काळजी घेतली जाईल असे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत यांना दिले.
येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व शेतकरी बांधवांना आमदार राजेंद्र राऊत व कृषी विभागाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
या आढावा बैठकीस तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी नगरसेवक प्रा. प्रकाश मनगिरे, मंडळ कृषी अधिकारी भारत महिंगडे, सोमनाथ साठे, सौ. स्वाती सांगळे, जीवन जगदाळे, अमोल गायकवाड, सुधीर काशीद, एन.बी. जगताप, खत विक्रेते राहुल मुंढे, उमेश चव्हाण, बप्पा कोकाटे, नाना मते आदी उपस्थित होते.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न