Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > आमदार राजेंद्र राऊत यांचे पत्रावरुन तहसिलदारांचे न्यायालयीन वाटप तडजोडीच्या हुकुमनाम्याच्या नोंदीचे आदेश

आमदार राजेंद्र राऊत यांचे पत्रावरुन तहसिलदारांचे न्यायालयीन वाटप तडजोडीच्या हुकुमनाम्याच्या नोंदीचे आदेश

मित्राला शेअर करा

मा . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध न्यायालयामध्ये लोकन्यायालयाचे आयोजन केले जात होते . लोक न्यायालयामध्ये झालेल्या तडजोडीप्रमाणे पक्षकारांच्या मिळकतीच्या हक्कपत्रकी संबंधित नोंदी घेणे आवश्यक होते . परंतु शेतजमिनीच्या वाटपाच्या तडजोडी ज्या लोक न्यायालयामध्ये होतात व त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदीसाठी दिल्या जात होत्या तेव्हा संबंधित मंडल अधिकारी व तलाठी हे त्याचेवर आक्षेप घेवुन नोंदीचे मुद्रांक शुल्क भरले नसल्याने नोंदी लावत नव्हते . ही तक्रार गेली तीन ते चार वर्षे चालु होती सदर तक्रारीचा पाठपुरावा यापुर्वी बार्शी वकिल संघाने वेळोवेळी केला .

प्रसंगी वकिलांनी तहसिल कार्यालय बार्शी यांचेसमोर उपोषणही केले परंतु त्याची दाद घेतली गेली नाही . लोक न्यायालयाचा उद्देशच हा होता की शेतकऱ्यांनी कमीत कमी खर्चात त्यांचे मिळकतीचे वाटप होवुन त्यांचे रितसर हक्कपत्रकी नोंदी व्हाव्यात परंतु महसुल अधिकाऱ्यांच्या नोंदणी शुल्क भरल्याशिवाय नोंदी न घेण्याच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत होते . व त्याचा खर्च पे नसल्याने लोक न्यायालयातही तडजोडी होत नव्हत्या . पर्यायाने लोक न्यायालयाचा उद्देश सफल होत नव्हता . ही बाब वकिल संघाने आमदार राजेंद्र राऊत यांचे लक्षात आणुन दिली व तसे निवेदनही दिले .

सदरची बाब ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असल्याने व शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने आमदार राजेंद्र राऊत यांनी मा.तहसिलदार साहेब बार्शी यांना पत्र दिले व महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार तडजोड हुकुमनाम्याच्या नोंदी गावकामगार तलाठी व मा.मंडल अधिकारी यांनी घ्याव्यात असे नमुद केले . सदर पत्राचा मा तहसिलदार यांनी गांभीर्याने विचार करुन दि . २३/११/२०२१ रोजी बार्शी तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांना पत्र काढुन शासन परिपत्रकानुसार मा . न्यायालयाकडुन हुकुमनाम्याचा किंवा आदेशाचा दस्तऐवज प्राप्त झाल्यास न्यायालयाच्या वाटप तडजोड हुकुमनाम्याच्या आदेशानुसार नोंदी घेणेबाबत नियमानुसार कारवाई करावी असा आदेश दि . २३/११/२०२१ रोजी पारित केलेला आहे .

आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्यास यश येवुन शेतकऱ्यांचा गेला तीन ते चार वर्षे प्रलंबित असणाऱ्या तडजोड हुकुमनाम्याच्या नोंदी घेण्याचा प्रश्न सुटलेला आहे .आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या प्रयत्नामुळे सदरचा प्रश्न मार्गी लागला , त्यामुळे बार्शी वकिल संघातर्फे आमदार राजेंद्र राऊत यांचा बार्शी बार असोशिएशन येथे सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.