Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > अभ्यासात अपयश आल्यास खचू नका; उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले

अभ्यासात अपयश आल्यास खचू नका; उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले

अभ्यासात अपयश आल्यास खचू नका; उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले
मित्राला शेअर करा

सोलापूर,दि.14 : अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांसह, इतर पुस्तकांचा अभ्यास करावा. अपयश आले म्हणून खचून न जाता जोमाने अभ्यास केल्यास यश नक्की मिळते, असे प्रतिपादन महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी केले.

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’निमित्त आयोजित व्याख्यानात अध्यक्ष म्हणून श्री. उदमले बोलत होते. यावेळी तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, प्रमुख वक्त प्राचार्य हरिदास रणदिवे, लेखक ज्ञानेश्वर जाधवर, उपायुक्त श्रीमती भगत, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

श्री. उदमले यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या पुस्तकासोबत इतर पुस्तकांचा, ग्रंथही वाचावेत. कोणतेही पुस्तक वाचले तर त्यातून तुम्हाला तुमच्या जीवनात उपयोगी पडेल, असेच असेल. वाचन केल्यास मार्गक्रमण करण्यास प्रेरणा मिळते, अभ्यास करून अधिकारी होऊन राज्याच्या विकासात भर घालण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘जगण्याची प्रेरणा वाचन’ यावर बोलताना प्राचार्य रणदिवे यांनी सांगितले की, जीवनात असण्याला अर्थ आहे. जगण्यासाठी काही तरी साध्य लागते, त्यातून प्रेरणा निर्माण होते. सतत कार्यमग्न राहिल्यास कायम आनंदी आणि दीर्घायुष्य राहते, याबाबतचे जपानमधील गावाचे त्यांनी उदाहरण दिले. निवृत्तीची चिंता न करता प्रत्येकांनी स्वत:ला कामात गुंतवून घेतल्यास आनंद मिळण्यास मदत होईल. स्वातंत्र्यवीर भगतसिंग यांना तुरूंगातही वाचनाची आवड होती. मृत्यूच्या शेवटच्या क्षणांपर्यंत ते वाचन करीत होते. यामुळे प्रत्येकांनी आवर्जुन वेळ काढून वाचन करावे.

वाचन हा स्थायीभाव होऊन ग्रंथ आपलेसे करावेत. पुस्तक कधी डिस्चार्ज होत नाहीत, वयावर आणि आजारावर वाचन मात करू शकते. शरीराला व्यायामाची आवश्यकता आहे, तसे वाचन केल्याने मेंदूला व्यायाम होतो. प्रत्येक गावात सुसज्ज वाचनालय हवे, त्यांना नाविन्यपूर्ण योजनेतून स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणि इंटरनेट देण्याची मागणीही श्री. रणदिवे यांनी केली.

श्री. जाधवर यांनी सांगितले की, साहित्यिक समाजाला दिशा देण्याचे काम करतात. समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यामध्ये ग्रंथांचे मोठे योगदान आहे. डिजीटल तंत्रज्ञानामुळे साहित्यातील बिभित्सपणा यायला नको, वाचकांनी आपण काय वाचावे, हे ठरवावे. प्रत्येकांनी आत्मबळ वाढविणारे साहित्य वाचले पाहिजे. जिथे मिळेल, जे मिळेल ते वाचा. त्यातून आनंद मिळतो. वाचन संस्कृती, वाचक चळवळी वाढल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी श्री. उदमले यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि ग्रंथालय चळवळीचे रंगनाथन यांच्या प्रतिमांचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी परिसर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी डीएड आणि बीएड महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकातून ग्रंथालय अधिकारी श्री. जाधव यांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार यांनी केले तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले.