अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे निर्देश
सोलापूर : आषाढी वारीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, यात्रा कालावधीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामुळे वारीसाठी नियुक्त शासकीय, खाजगी अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेऊनच यावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी तथा वारीचे इन्सिडन्ट कमांडर संजीव जाधव यांनी दिले.
नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाबाबत श्री. जाधव बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शमा पवार, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सोनिया बागडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्यासह माढा, माळशिरस, पंढरपूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
वारी कालावधीत कोविडच्या उपाययोजना पाळणे महत्वाचे आहे. पालखी सोहळा प्रमुख, पालखीसोबत येणारे वारकरी यांनी कोरोनाचा बुस्टर डोस घेऊनच यावे. तसेच सव्याधी (कोमॉर्बिड) वारकऱ्यांनी पालखीसोबत चालत येणे टाळावे, शिवाय गर्दीचा संपर्क टाळावा. सर्व वारकऱ्यांनी वारी कालावधीत कोविड 19 चे नियम पाळावेत. मास्कचा वापर करावा, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे. संशयित वारकरी कोरोना पॉझिटिव्ह असल्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्याच्या सूचनाही त्यांनी केली.
पालखी मार्गांवर 105 उपचार केंद्र असणार आहेत, त्याठिकाणी पुरेसा औषधसाठा, तज्ञांची वैद्यकीय टीम उपलब्ध ठेवावी. या केंद्रावर संशयितांची कोविड तपासणी करावी. वारीमध्ये सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांवर औषधोपचार करावे, मात्र त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याची सूचनाही श्री. जाधव यांनी केली.
पाणीपुरवठ्यासाठी पालखी मार्गांवर 63 पाण्याचे स्रोत निश्चित केले असून त्या ठिकाणाहून पाण्याचे टँकर भरले जाणार असल्याची माहिती श्री. कोळी यांनी दिली.
श्रीमती पवार यांनी वारी नियोजनाबाबत माहिती दिली. प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी चोख पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
श्रीमती बागडे यांनी आरोग्य विभागानी केलेल्या तयारीची माहिती दिली. वारीमध्ये 60 ॲम्ब्युलन्स बाईक असणार आहेत. ज्याठिकाणी अत्यावश्यकता भासेल तिथे बाईक जाऊन प्रथमोपचार करणार आहेत. बाईकस्वारांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न