Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शी न. पा. थकित करदात्यांना वेळ द्या, जप्तीची कारवाई नको, अन्यथा आंदोलन

बार्शी न. पा. थकित करदात्यांना वेळ द्या, जप्तीची कारवाई नको, अन्यथा आंदोलन

बार्शी - नगरपालिका हद्दीतील थकित करदात्यांना घरपट्टी, पाणीपट्टी याचे थकित रक्कम भरण्यासाठी वेळ द्या, त्यांच्यावर जप्तीची कारवाई नको
मित्राला शेअर करा

अन्यथा नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात लोकहितासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन व इशारा बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अमिता दगडे- पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया गुंड पाटील, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे व शहराध्यक्ष संदीप आलाट, काँग्रेस आय पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीम भाई पठाण, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, शोएबभाई सय्यद या पक्ष व संघटनांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे निवेदनाद्वारे दिला आहे.

मागील काही दिवसापासून बार्शी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील मिळकतदारांच्या वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील बऱ्याच थकित करदात्यांना कर भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत त्या नोटिसा नंतर बार्शी नगरपालिकेने जप्ती वॉरंटीचे आदेश काही दैनिकांमध्ये छापून मिळकत दारांची नावे जाहीर केली आहेत. मार्च 2022 पासून कोरोना महामारी मुळे पूर्ण जग थांबले होते. सर्वत्र लॉक डाऊन होता. गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील सर्व व्यवस्था रोजगार ठप्प झाले होते मोलमजुरी करणार्‍यांना सुद्धा उपासमारीची वेळ आली.

त्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये शहरातील 70 टक्के मिळकत दारांचे नगरपालिकेचे थकीत राहिले. अशा परिस्थितीमध्ये ऐनवेळी जप्ती वॉरंट रद्द करण्यासाठी भरावी लागणारी रक्कम बऱ्याच नागरिकांकडे उपलब्ध नाही. मार्च अखेर असल्यामुळे गोरगरीब नागरिकांना पैसे जमा करताना ओढाताण होत आहे. तसेच मिळकतदार नागरिकांची नावे वसुलीसाठी दैनिकांमध्ये प्रसिद्ध करून नगरपालिकेने सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे. सदर थकित मिळकत दार नागरिकांची नावे दैनिकांमध्ये प्रसिद्ध करू नयेत तसेच थकबाकीची रक्कम हप्ते पाडून देण्यात यावी तसेच रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशा प्रकारचे निवेदन वरील पक्ष व संघटनांच्या वतीने मुख्याधिकारी दगडे पाटील यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून गोरगरीब नागरिकांना कर भरण्यासाठी सवलत देण्यात यावी त्यांच्यावर जप्तीची कारवाई करू नये अन्यथा लोकहितासाठी रस्त्यावर उतरून नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे वरील पक्ष व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.