कला माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असते आजपर्यंत कलेमुळे अनेकांना पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार मिळालेले आपण अनेकवेळा पाहिले आहेत. मात्र कलेमुळे कुणाला ‘डोळा’ मिळाल्याचं उदाहरण आपण कधीच पाहिलं नसेल.

जामगाव, तालुका बार्शी येथील युवा चित्रकार महेश मस्के यांना आपल्या चित्रकलेमुळे एक डोळा मिळाला आहे. महेश हे लहानपणापासूनच एका डोळ्याने अंध आहेत. एका डोळ्यावरच त्यांनी आजपर्यंत हजारो चित्रांचे रेखाटन केलं आहे. महेश पेन्सिल स्केच तर अप्रतिम काढतातच, मात्र पिंपळाच्या पानावर त्यांनी रेखाटलेली चित्रे सोशल मीडियात कायम चर्चेचा विषय ठरतात.
लहानपणी वडिलांसोबत गुरे राखायला गेलं की, गुरांच्या पायांचे चिखलात उमटलेले ठसे जशेच्या तसे शेजारीच चिखलात रेखाटायची सवय महेश यांना एवढा मोठा चित्रकार करेल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल.
महेश यांनी आजपर्यंत अनेक कलाकार, अभिनेते, लोकप्रतिनिधी, लोकाभिमुख अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची पेन्सिल स्केच व पिंपळाच्या पानावरची चित्रे रेखाटली आहेत.
शरद पवार, अजित पवार, उदयनराजे भोसले, देवेंद्र फडणवीस यांसोबत अनेक नेत्यांना व सेलिब्रिटींना त्यांच्या चित्रांनी भुरळ पाडली आहे.
महेश यांना पिंपळाच्या पानावरील चित्रातून मोठी प्रसिद्धी मिळाली. अनेकांनी त्यांची ही चित्रे पोस्ट करून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिलंही. मात्र अमेरिकेतल्या डॉक्टरांनी त्याची चित्रे पाहून महेशसाठी जे केलं ते इतर कोणालाही करता आलं नाही.
जन्मापासून एका डोळ्याने अधू असलेल्या महेशला अमेरिकन डॉक्टरांनी पुण्यात येऊन एक कुत्रीम डोळा दिला. आता त्या डोळ्याने महेशला दिसत नसलं तरी त्याची दिसणारी कुरुपता कमी झाली आहे. महेशचे दोन्ही डोळे आता सामान्य माणसासारखे सुंदर दिसतात.
अमेरिकन डॉक्टरांनी महेशच्या कलेकडे पाहून त्याला दिलेलं हे गिफ्ट तो सर्वोच्च मानतो.. डोळा बसवल्यानंतर महेशने जेव्हा पाहिल्यांना आरशात पाहिलं तेव्हा, तो धाय मोकलून रडला.. आजपर्यंत समाजाने त्याच्या डोळ्यांकडे पाहून केलेला त्याचा तिरस्कार, अवहेलना, आणि त्याचा न्यूनगंड एका क्षणात अश्रुंबरोबर वाहून गेला.
आपल्यावर विनोमोबदला उपचार करणाऱ्या अमेरिकेतल्या डॉक्टरांना महेश आता आपला देव मानतो. डोळा बसवल्यावर महेशने त्या डॉक्टरांना पिंपळाच्या पानावर त्यांची नावे रेखाटून दिली..
कला एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती परिवर्तन करू शकते, हे महेशच्या या घटनेनं दाखवून दिलंय..
महेश यांचा मोबाईल नंबर – 9881463806
- गणेश गायकवाड
More Stories
श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
राष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत बार्शीतील कसपटे यांचा समावेश
धनंजय पाटील यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी एम्प्लॉईज फेडरेशन सदस्यपदी निवड