भात म्हणजेच तांदूळ शेती प्रामुख्याने कोकणात केली जाते, परंतु राज्यातील इतर भागात सुद्धा भात शेतीचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच पारंपरिक पांढऱ्या तांदळासोबत काळा अणि लाल तांदूळ लागवड शेतकर्यांच्या दुप्पटीपेक्षा जास्त दर मिळवुन देणारे पीक ठरत आहे.
सद्य:स्थितीमध्ये रायगड जिल्ह्यात भातशेतीचे असणारे क्षेत्र जवळपास 1 लाख हेक्टर आहे. मिळणारे दरडोई उत्पन्न वार्षिक रू.1 लाख 25 हजार इतके कमी असल्याने तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे 87 टक्के प्रमाण आणि 3 हजार 500 मि.मी. पाऊस आणि त्यात होणारे बदल यामुळे उत्पन्नात घट होते. या परिस्थितीत रंगीत भात हे एक वरदान ठरले आहे.
भात हे जास्त पावसात तग धरणारे एकमेव पीक आहे. या पिकाच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी रंगीत भात लागवड प्रायोगिक तत्वावर केली असून त्याचे बाजारातील आजचे दर कमीत कमी रू.120 ते जास्तीत जास्त रु.350 प्रति किलो आहे. त्याचे पोषणमूल्य साध्या भातापेक्षा खूप जास्त आहे. मधुमेही, हृदयरोगी, लकवा, संधीवात, सोरायसिस, उच्च रक्तदाब, कॅन्सर इ. आजार असलेल्या व्यक्ती तसेच लहान बालके, गर्भवती व स्तनपान करणाऱ्या माता या सर्वांसाठी उपयुक्त असून त्यात पोषण तत्वे उच्च प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्याच्या लागवडीचे नियोजन केले होते.
या भाताची वैशिष्ट्ये:-
- नेहमीच्या भातापेक्षा या भातामध्ये Antocyninचे प्रमाण खूप जास्त आहे. Antocynin हे एक प्रकारचे Antioxident आहे. ज्यामुळे माणसाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- हा भात ग्लुटेन फ्री असल्याने वाढते वजन, मधुमेह, अल्सर व इतर अनेक आजारांमध्ये उपयुक्त असून आहारामध्ये समावेश करण्यासाठी अत्यंत योग्य आहे.
- यातील प्रोटीनचे प्रमाण 4-12 टक्के व लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम उच्च प्रमाणात आहे.
- साखर व मेद फॅट या भातामध्ये नसल्याने वजन घटविण्यासाठी हा भात चांगला असून या संदर्भात अनेक संशोधन व चाचण्या सुरू आहेत.
- पूर्वी राजघराण्यात दीर्घायुषी होण्यासाठी या भाताचा वापर केला जात असे.
सर्वसामान्यांनी याचा वापर आहारात कसा करावा:-
हा भात शिजविण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याकरिता तो प्रथम 4 तास भिजवून मगच नेहमीपेक्षा डबल शिट्टया देवून शिजवावा. ज्यांना यासाठी वेळ नसेल त्यांनी या भाताचे पिठ करून त्यापासून बनविलेल्या भाकरीचा समावेश आहारात करावा. या पिठापासून डोसा, आप्पे, घावणे, उत्तपा, इडली बनविणे सहज सोपे आहे.
या भातापासून पांगल, गोड भात, खिचडी, खीर, बिर्याणी, पुलाव, पापड, कुरडया, लाडू सुध्दा बनविता येतात. सध्या बाजारात याचे पोहे, मुरमुरे, पिठे उपलब्ध आहेत. त्याचा वापर लहान मुलांसाठी केल्यास त्याच्या विविध रंगांमुळे व चवीमुळे निश्चितपणे आवडेल.
रायगड जिल्ह्यात हा प्रयोग कशा पध्दतीने राबविला:
याचे बियाणे छत्तीसगड मधील आणि आपल्या राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आत्मा योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण बाबीखाली शेतकऱ्यांपर्यंत दिले गेले. उत्तर रायगडमध्ये या भाताचा प्रयोग जास्त यशस्वी झाला नाही मात्र दक्षिण रायगड मधील तालुक्यांमध्ये रंगीत भाताचे उत्पादन चांगल्या प्रमाणात आले. त्याचप्रमाणे काळ्या भातापेक्षा लाल भाताचे भाताचे उत्पादन चांगले दिसून आले.
मागील हंगामात भात 91 हेक्टर क्षेत्रावर व काळा भात 93 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आणि त्यापासून अनुक्रमे 31 व 28 क्विंटल/ हेक्टर उत्पादन झाले. यावर्षी शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध असल्याने ते वेळेत लागवड करू शकतील, असे चित्र आहे. त्याचप्रमाणे त्यांना आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बियाणे लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यास सांगितले असल्याने खरीप 22 मध्ये शासनाच्या मदतीशिवाय साधारण 500 हेक्टर क्षेत्रावर रंगीत भाताची लागवड होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बियाणे व खते याचे मागणीप्रमाणे पुरवठा होईल, यासाठी वारंवार निविष्ठा पुरवठादारांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे क्षेत्रिय पातळीवर तालुका कृषी कार्यालयांनीही आपल्या तालुक्यासाठी आवश्यक आराखडा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्येक गावाच्या पिकांचा व विस्तार कार्यक्रमांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी सुध्दा बियाणे खते उपलब्धतेबाबत काही अडचणी असल्यास तात्काळ आपल्या जवळील कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / मंडळ कृषी अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी यांना कळवावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी केले आहे
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद