Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > सोलापूर जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे मॉडेल करिअर सेंटरमध्ये परिवर्तन

सोलापूर जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे मॉडेल करिअर सेंटरमध्ये परिवर्तन

सोलापूर जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे मॉडेल करिअर सेंटरमध्ये परिवर्तन
मित्राला शेअर करा

सोलापूर : देशातील युवकांच्या भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने त्यांनी उत्तम कौशल्य प्राप्त करून सुयोग्य रोजगाराची निवड करावी, यादृष्टीने केंद्र शासनाद्वारे उभरत्या युवाशक्तीच्या रोजगाराविषयक मार्गदर्शनावर विशेषत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. रोजगार महानिदेशालय, श्रम व रोजगार मंत्रालय यांच्यामार्फत “राष्ट्रीय करिअर सेवा” ही योजना मंजूर करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत रोजगारविषयक विविध सेवा पुरविण्याचे प्रयोजन आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाद्वारे प्रत्येक राज्यामध्ये सर्वसमावेशक असे “मॉडेल करिअर सेंटर” स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. या सेंटरमार्फत कौशल्यावर आधारीत रोजगारांच्या संधीचा / मागणीचा शोध घेऊन युवावर्गातील प्रशिक्षणार्थीना त्यांच्या कल-क्षमतेनुसार प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधितांना रोजगार मिळण्यासाठी नियोक्त्यांच्या संपर्कात आणण्यात येणार आहे. मॉडेल करिअर सेंटर या योजनेचा उद्देश हा ग्रामीण, स्थानिक तसेच निमशहरी भागातील रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी, तंत्रज्ञानाचा वापर करून समुपदेशन आणि प्रशिक्षण पारदर्शीरित्या व प्रभावी पध्दतीने उपलब्ध करुन देणे हा आहे.

मॉडेल करिअर सेंटर या योजनेअंतर्गत रोजगार बाजार क्षेत्राचा अभ्यास करुन रोजगारांच्या संधीचे अंदाज वर्तविणे, उमेदवारांना त्यांचे कौशल्य, स्वारस्य आणि मागणीचा विचार करुन समुपदेशन करणे, मनुष्यबळाच्या मागणीनुसार, रोजगारक्षम व कौशल्ययुक्त मनुष्यबळाची सांगड घालणे आणि केंद्रामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा विविध मार्गाने प्रचार व प्रसिध्दी करणे अशा प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत.

योजनेसाठी रोजगार संचालनालय, नवी दिल्ली यांनी सोलापूर जिल्ह्यातील मॉडेल करिअर सेंटर स्थापनेसाठी 47.03 लाख रुपयांची मान्यता देण्यात आली असून लवकरच जिल्ह्यात मॉडेल करिअर सेंटर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे स्थापन करण्यात येणार आहे.